Ashadhi Ekadashi 2022: : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती. अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत शेतकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना महापुजेचा मान मिळाला. गेल्या २० वर्षांपासून ते वारी करत आहेत.
५२ वर्षीय शेतकरी मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले (४७) हे मागील २० वर्षांपासून न चुकता पायी वारी करत आहे. गेल्या १२ वर्षांपासून ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पायी चालत विठुरायाच्या दर्शनाला येत आहेत. विठ्ठलाच्या भक्तीभावात तल्लीन झालेलं हे दाम्पत्य बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील रूई येथील रहिवासी आहे. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून १९८७ पासून हे दाम्पत्य न चुकता वारी करत आहेत.
यावर्षी त्यांना आषाढी एकादशी २०२२- ‘मानाचा वारकरी सन्मान’ मिळाला आहे. आज पहाटे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत महापुजेमध्ये सहभाग घेतला. या महापुजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानाचा वारकरी सन्मान मिळवणाऱ्या नवले दाम्पत्यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.