गडचिरोली जिल्हय़ातील सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली गावात गुरुवारी भर दुपारी बाजारात नक्षलवाद्यांनी एका पोलीस शिपायाची गोळय़ा झाडून हत्या केली. तर दुसऱ्या घटनेत नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या सावरगाव पोलीस ठाण्यावर गुरुवारी पहाटे सुमारे एक तास गोळीबार केला. या दोन्ही घटनांनी सीमावर्ती भागात पुन्हा दहशत निर्माण झाली आहे.
आंध्रप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या आसरअल्ली गावात गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास संजय रेड्डी हा पोलीस दलातील जवान पत्नीसोबत दुचाकीहून बाजारात खरेदीसाठी जात असताना जिल्हा मध्यवर्ती बँंकेच्या शाखेसमोर दुचाकीहून आलेल्या दोन अज्ञात नक्षलवाद्यांनी त्याला अडवले आणि या जवानावर गोळय़ा झाडल्या. त्याच्या पत्नीलासुध्दा एक गोळी लागली आहे. या घटनेत हा जवान जागीच ठार झाला. बाजारात प्रचंड वर्दळ असताना नक्षलवाद्यांनी हे कृत्य केले. या घटनेनंतर प्रचंड पळापळ झाली.
शीघ्रकृती दलाचे कृत्य?
नक्षलवाद्यांच्या शीघ्रकृती दलाने हे कृत्य केले असावे, असा संशय पोलिसांना आहे. गेल्या चार वर्षांपासून आसरअल्लीला कार्यरत असलेला हा जवान नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर होता. या जिल्हय़ात याआधीही नक्षलवाद्यांनी भर बाजारात जवानांना ठार केले आहे. दुसरीकडे गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास नक्षलवाद्यांनी धानोरा तालुक्यातील सावरगांव पोलीस ठाण्यावर तुफान गोळीबार केला. काही महिन्यापूर्वीच हे ठाणे सुरू करण्यात आले होते. नक्षलवाद्यांनी गोळय़ा झाडताच ठाण्यातील जवानांनी त्याला प्रत्युत्तर देणे सुरू केले. सुमारे एक तास ही चकमक सुरू होती. त्यानंतर नक्षलवादी निघून गेले. या घटनेत कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोन्ही घटनांमुळे सीमावर्ती भागात दहशतीचे वातावरण आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा