नक्षलवादी कमांडरच्या मुली, नातेवाईक, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या आदिवासींच्या मुली व पोलीस जवानांचे कुटुंबीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गडचिरोली जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आर. आर. पाटील व पोलीस महासंचालकांशी संवाद साधण्यासाठी थेट मुंबईला निघाल्या आहेत. मुंबईतील पोलीस शिपाई शहीद, तर मग गडचिरोलीत शहीद होणाऱ्या शिपायाशी सापत्न वागणूक का, असा प्रश्न ते थेट मुख्यमंत्र्यांनाच करणार आहेत.
गडचिरोली जिल्हा पोलीस व आदिवासी विकास विभागाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजनेंतर्गत आश्रमशाळेतील ९० विद्यार्थ्यांची सहल गडचिरोली येथून थेट महाराष्ट्र दर्शनाला निघाली आहे. यात सहभागी विद्यार्थ्यांमध्ये नक्षलवाद पीडित, नक्षलवाद्यांचे नातेवाईक, कोरची दलम कमांडर कुमारसाय कतलामी ऊर्फ पहाडसिंग यांच्या चंद्रकांता व वनिता या दोन मुली, तसेच प्रीती ही नातेवाईकही आहे. त्यांच्या सोबतीला मलाडखंज एरिया समिती सदस्य सज्जनसिंग मडकाम यांची पुतणी आशा शंकर मडकाम हिचाही समावेश आहे.
जंगलात एकमेकांविरुद्ध लढणाऱ्यांची मुले व त्याचा परिणाम भोगावा लागणाऱ्या स्थानिक आदिवासींच्या मुलांना यानिमित्ताने एकत्र येऊन सहलीचा आनंद घेत आहेत. मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, शिर्डी, शेगावसह महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना हे सर्व विद्यार्थी भेट देणार आहेत. या वेळी विद्यार्थिनी मुख्यमंत्र्यांना गडचिरोली जिल्ह्य़ाची सविस्तर माहिती देणार आहेत, तसेच नक्षलवाद्यांचा बंदोबस्त तातडीने करण्याची मागणीही त्या करत आहेत.
मुंबईचा पोलीस शहीद झाला, तर शहीद व नक्षलवाद्यांशी लढा देत गडचिरोलीचा पोलीस शहीद झाला, तर त्याच्याशी सापत्न वागणूक का, असा प्रश्नही त्या साऱ्याजणी मुख्यमंत्र्यांना करणार आहेत. योगायोग असा की, मुंबईच्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला मंगळवार २६ नोव्हेंबरला पाच वष्रे पूर्ण होत आहेत. त्याच दिवशी या सर्व विद्यार्थिनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. गडचिरोलीत ८९ टक्के जंगलाचे क्षेत्र असून शुद्ध हवा व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ते इतर जिल्ह्य़ांमध्ये नाही. ज्याप्रमाणे मुंबई पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला केला तसाच या जिल्ह्य़ातील पोलीस समाजविघातक शक्तींचा सामना संयम व धर्याने करतात, याची माहितीही मुख्यमंत्र्यांपासून तर गृहमंत्री व पोलीस महासंचालकांना देणार आहेत. एकूणच या नक्षलवाद्यांच्या कुटुंबीयांच्या व पीडितांच्या मुलांच्या महाराष्ट्र दर्शन सहलीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा