शेजारच्या गडचिरोली जिल्हय़ातील एटापल्ली तालुक्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये रविवारी सकाळी जोरदार चकमक उडाली. यात या दलाचे तीन जवान जखमी झाले असून, त्यापैकी गंभीर जखमी असलेल्या एका जवानाला नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.जखमी जवानांपैकी सौरभ जाधव हा सातारा जिल्हय़ातील वाईचा राहणारा आहे.
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या १९२ व्या तुकडीचे मुख्यालय एटापल्ली तालुक्यातील जाराबंडी येथे आहे. या मुख्यालयातील शंभर जवान रविवारी पहाटे शोध मोहिम राबवण्यासाठी निघाले. कसनसूर ते जाराबंडी मार्गावर रोपी गावाजवळच्या जंगलात हे जवान मोहिम राबवत असतांना गर्दापल्ली गावाजवळच्या जंगलात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. यात सुभाष चंद्रा, सौरभ जाधव व संतोष हलधर हे तीन जवान जखमी झाले. नक्षलवाद्यांनी या जवानांच्या दिशेने काही बॉम्बसुध्दा फेकले. यात सुभाष चंद्रा हा जवान गंभीर जखमी झाला. इतर दोन जवानांना बंदुकीच्या गोळय़ा लागल्या. अचानक गोळीबार सुरू झाल्याने जवानांना प्रारंभी प्रतिकार करण्यासाठी वेळ मिळाला नाही. दहा मिनिटानंतर या जवानांनी नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देणे सुरू केले. सकाळी अकराच्या सुमारास सुरू झालेली ही चकमक एक तास सुरू होती. या चकमकीची माहिती पोलिस मुख्यालयाला मिळताच तातडीने अतिरिक्त कुमक या भागात रवाना करण्यात आली. ही चकमक थांबल्यानंतर जखमी जवानांना जाराबंडी येथे आणण्यात आले. तेथून या जवानांना हेलिकॅप्टरने गडचिरोलीला आणण्यात आले. या जवानांसोबत जिल्हा पोलिस दलाचे काही जवान सुध्दा होते. चकमकीनंतर जंगलात पळून गेलेले नक्षलवादी याच भागात दडून बसलेले असल्याने येथे सध्या मोठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. अलीकडच्या सहा महिन्यांत सुरक्षा दलाचे जवान जखमी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Story img Loader