गडचिरोली जिल्ह्य़ात विकास कामांवर कोटय़वधीचा निधी खर्च केला जात असतांना नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये आतापर्यंत २५ कोटींच्या मालमत्तेचे नुकसान केले असून, गेल्या पाच वर्षांत त्यांनी सर्वाधिक ११ कोटींच्या साहित्याची जाळपोळ व तोडफोड केली आहे.
पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्य़ात १९८० मध्ये नक्षलवादी चळवळीने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. या भागातील जंगलावर अधिराज्य गाजवून त्यांनी तेंदुपत्ता कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करणे सुरू केले. त्यानंतर आपला मोर्चा विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे वळविला. जीवे मारण्याची भीती दाखवत व शस्त्रांच्या बळावर नक्षलवाद्यांनी विकासकामांना उधळून लावून आतापर्यंत २४ कोटी ९१ लाख २१ हजार ३११ रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान केले. नक्षलवाद्यांकडून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची सर्वात पहिली घटना १२ जुलै १९८२ रोजी सिरोंचा तालुक्यातील बिऱ्हाडघाट येथे घडली. या वेळी नक्षलवाद्यांनी वनविभागाचे ८ हजार रुपये किमतीचे लाकूड कापले. यानंतर वनविभाग व खाजगी संस्थांची जळाऊ बिटे जाळली.
सागवानाची झाडे तोडणे, रस्त्याच्या कामावरील खाजगी कंत्राटदारांचे काम बंद पाडून त्यांच्या साहित्याची जाळपोळ करणे, ग्रामपंचायतीचे साहित्य जाळणे व शाळांची तोडफोड करणे आदी विध्वंसक कामे नक्षलवाद्यांनी सुरू केली. १९८० ते १९८५ या कालावधीत त्यांनी १ लाख २१ हजार रुपयांच्या साहित्याची जाळपोळ केली. १९८६ ते १९९० या काळात हा आकडा कोटीवर पोहोचला. या कालावधीत १ कोटी ३९ लाख ९५ हजार ६३४ रुपयांचे नुकसान करण्यात आले. १९९१ ते १९९५ या कालावधीत २ कोटी ६९ लाख ४८ हजार ९०९ रुपये, १९९६ ते २००० या कालावधीत २ कोटी ३७ लाख ९१ हजार ४७२ रुपये, तर २००१ ते २००७ या काळात ७ कोटी ४३ लाख ६८ हजार ५७२ रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान केले. २००८ ते ३१ ऑगस्ट २०१३ या कालावधीत नक्षलवाद्यांनी १० कोटी ९८ लाख ९५ हजार ७२४ रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान केले. यात ४ कोटी १६ लाख ६४ हजार ३०० रुपयांची शासकीय मालमत्ता व ६ कोटी ८२ लाख ३१ हजार ४२४ रुपयांच्या खाजगी मालमत्तेचा समावेश आहे. तसेच २००८ या वर्षांत ५६ लाख ८१ हजार ३७७ रुपयांची शासकीय, तर १ कोटी २९ लाख २६ हजार १३० रुपयांची खाजगी मालमत्ता, अशी एकूण १ कोटी ८६ लाख ७ हजार ५०७ रुपयांचे नुकसान नक्षलवाद्यांनी केले. गेल्या पाच वर्षांंत झालेल्या शासकीय नुकसानीत जवळपास निम्मे नुकसान वनविभागाचे झाले आहे.
२००८ ते २०१३ या कालावधीत नक्षलवाद्यांनी वनविभागाची २ कोटी ३४ लाख ३७ हजार ८३६ रुपयांची मालमत्ता जाळून खाक केली. नक्षलवाद्यांनी वनविभागाचे ५४ लाख ३७ हजार १४७ रुपये किमतीचे लाकूड जाळले. २००८ मध्ये वनविभागाचे २४ लाख ४ हजार ५७७ रुपये किमतीचे लाकूड, २००९ मध्ये १ कोटी ३६ लाख ५८ हजार ८४७ रुपये, २०१० मध्ये ९ लाख २८ हजार ३४७ रुपये, २०११ मध्ये १९ लाख ६७ हजार ४२९ रुपये, तर २०१२ मध्ये नक्षलवाद्यांनी वनविभागाचे ४४ लाख ८७ हजार ५९६ रुपये किमतीचे लाकूड जाळले.
या व्यतिरिक्त शासनाच्या विविध विकासकामांना विरोध करून आदिवासी बांधवांना मुलभूत गरजांपासून दूर ठेवण्याचे कामही नक्षलवादी सातत्याने
करीत आहेत.
नक्षलवाद्यांकडून गडचिरोलीत २५ कोटींची हानी
गडचिरोली जिल्ह्य़ात विकास कामांवर कोटय़वधीचा निधी खर्च केला जात असतांना नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये आतापर्यंत २५ कोटींच्या मालमत्तेचे नुकसान केले असून,
आणखी वाचा
First published on: 23-11-2013 at 02:22 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxal damages the property of 25 crore gadchiroli