नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हय़ात गेल्या दोन महिन्यांच्या काळात नक्षलवाद्यांनी एका पोलीस शिपायासह सहा जणांची हत्या केल्याने दुर्गम भागात दहशतीचे वातावरण आहे. नुकत्याच संपलेल्या पोलीस निवड प्रक्रियेत सहभागी झालेले हजारो आदिवासी तरुण सध्या गडचिरोली व अन्यत्र तळ ठोकून आहेत. दुर्गम भागातून आलेले हे तरुण नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे गावी परतण्यास तयार नाहीत. गावात परत गेले की मरण ठरलेलेच आहे, अशी भीती या तरुणांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
 निवड प्रक्रियेत सहभागी होऊनसुद्धा पोलीस दलात संधी न मिळू शकलेल्या तरुणांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या तरुणांना आता पुढील वर्षीच्या निवड प्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे गावी परत न जाता शहरांमध्ये राहून मिळेल ती कामे करून गुजराण करायची वेळ या तरुणांवर आली आहे.  गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी २३ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश मिळवल्याने डिवचले गेलेले नक्षलवादी आता निरपराधांना लक्ष्य करीत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या जानेवारीपासून पाच चकमकींत तब्बल २३ नक्षलवादी ठार झाले. अलीकडच्या काही वर्षांत एवढय़ा मोठय़ा संख्येत नक्षलवादी ठार मारले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे खवळलेले नक्षलवादी पोलिसांना खिंडीत पकडण्याचे प्रयत्न करीत असले तरी त्यांना अद्याप यश आले नाही. यामुळे त्यांनी आता निरपराध लोकांना ठार मारण्याचे सत्र सुरू केले आहे. गेल्या १२ जूनला नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यात लॉयड स्टीलचे उपाध्यक्ष जसपालसिंग धिल्लन, हेमलता मिनरल्सचे मल्लिकार्जुन रेड्डी व सूरजागडचे पोलीस पाटील राजू सडमेक या तिघांची हत्या केली होती. यानंतर याच महिन्यात २८ जूनला नक्षलवाद्यांनी आसरअल्लीत भरदिवसा संजीव रेड्डी या पोलीस शिपायाची रस्त्यावर गोळय़ा झाडून हत्या केली.
काही दिवसांच्या अंतरात चार जणांचे बळी घेतल्यानंतर आता नक्षलवाद्यांनी पोलीसांचे खबरे असल्याचा ठपका ठेवून निरपराध आदिवासींना ठार मारणे सुरू केले आहे. या महिन्यात मुरमगावजवळील रेंगेपार येथे एकाची, तर येरकड येथे आणखी एका आदिवासीची हत्या करण्यात आली. दरवर्षी पावसाळय़ात नक्षलवादी सामान्य आदिवासींना खबरे ठरवून ठार मारतात. त्यामुळे या वर्षीसुद्धा नक्षलवाद्यांचे हत्यासत्र गडचिरोलीत सुरू झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या हत्यासत्रामुळे एटापल्ली, धानोरा व सिरोंचा तालुक्यातील दुर्गम भागात दहशतीचे वातावरण आहे. अनेक नागरिक आता स्थलांतर करू लागले आहेत. काही नागरिकांनी रोज रात्री पोलीस ठाण्यात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आहे.