पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून शुक्रवारी पहाटे नक्षलवाद्यांनी अहेरी तालुक्यातील देचलीपेठा येथील पोलिसांचे नातेवाईक असलेल्या श्रीनिवास मल्लय्या पुप्पुलवार (३२) व शैलेश राजावलू कारंगेलवार (२५) या दोन तरुणांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याने येथे दहशत व भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडवू न शकल्यामुळेच नक्षलवाद्यांनी हे कृत्ये केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ातील ३४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका अतिशय शांततेत पार पडल्या. त्या यशस्वी होऊ नये म्हणून नक्षलवाद्यांनी अतिदुर्गम भागात गावोगावी बॅनर्स, पोस्टर्स, पत्रके लावून मतदानात सहभागी होणाऱ्यांना ठार करू, अशी धमकी नक्षल्यांनी दिली होती. तरीही जनतेने जास्तीत जास्त मतदान करून सरासरी ८१.०५ टक्के मतदान केले. त्यामुळे खचून गेलेल्या नक्षलवाद्यांनी निष्पापांचे हत्यासत्र सुरू केले असून अहेरी तालुक्यातील देचलीपेठा येथील श्रीनिवास मल्लय्या पुप्पुलवार व शैलेश राजावलू कारंगेलवार या दोन तरुणांची दगडाने ठेचून हत्या केली.
महाराष्ट्र दिनाच्या पहाटे २० ते २५ च्या संख्येने नक्षलवादी देचलीपेठा येथे आले. घरात झोपलेल्या श्रीनिवास व शैलेश यांना बाहेर काढून चौकात आणले. तेथे त्यांना सर्वांसमोर बेदम मारहाण करून नाल्याजवळ दगडाने ठेचून हत्या केली. नक्षल्यांच्या तंबीनंतर हे दोघेही जण पोलिसांच्या संपर्कात होते. त्यामुळे दोघेही नक्षल्यांची माहिती पोलिसांना देतात, असा संशय नक्षल्यांना होता. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. श्रीनिवास पुप्पुलवार हा पोलिस कर्मचाऱ्याचा मेव्हणा आहे. तो जिमलगट्टा क्युआरटीमध्ये कार्यरत आहे. दरम्यान, या हत्यासत्रामुळे गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात भीतीचे वातावरण आहे.