पोलिसांना बिस्किटाचे पुडे विकले आणि पोलिसांच्या जनजागरण मेळाव्यात गाणी म्हटली या कारणावरून दोघांना नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्य़ातील किष्टापूर गावी मंगळवारी पहाटे शेकडो गावकऱ्यांसमोर गोळ्या घालून ठार केले. या घटनेने परिसरात कमालीची दहशत पसरली आहे.
छत्तीसगडच्या सीमेलगतच्या किष्टापूर या अतिशय दुर्गम गावी सोमवारी मध्यरात्री सुमारे १०० नक्षलवादी आले. त्यांनी सर्व गावकऱ्यांना उठवून मुख्य चौकात गोळा केले. या गावकऱ्यांसमोर किराणा दुकानदार राजू आत्राम (४५) व प्रतिष्ठित नागरिक लक्ष्मण सिडाम यांना उभे केले. राजूने पोलिस पथकाला बिस्कीटे विकून तर सिडाम यांनी पोलीस मेळाव्यात गाणी गाऊन चळवळीच्या नियमांचा भंग ठेवल्याचे जाहीर करण्यात आले. या दोघांनी पोलिसांना चळवळीची माहिती दिली नसल्याचे सांगितले. त्यांचे म्हणणे नाकारून त्यांना जेवढय़ा दूर पळता येईल तेवढे पळा, असे नक्षलवाद्यांनी फर्मावले. हे दोघे जिवाच्या आकांताने पळू लागताच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्यांच्या फैरी झाडत त्यांचा जीव घेतला. गावातील कुणीही असे कृत्य केले तर त्याचीही अशीच गत होईल, असे धमकावून व चळवळीच्या घोषणा देत ते गावातून निघून गेले.
या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आल्याचे गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी आज लोकसत्ताला सांगितले.

Story img Loader