खंडणीसाठी आणलेली रक्कम ताब्यात घेण्याच्या प्रकरणाचा गवगवा होऊ नये यासाठी नक्षलवाद्यांनी चळवळीला मदत करणाऱ्या पोलीस पाटलालासुद्धा पंधरा दिवसांपूर्वी एटापल्लीत लॉयड स्टीलच्या अधिकाऱ्यांबरोबर ठार केले, अशी माहिती आता समोर आली आहे.
एटापल्ली तालुक्यात सूरजागड परिसरात लोहखनिजाची खाण सुरू करण्याच्या प्रयत्नात असलेले लॉयडचे उपाध्यक्ष जसपालसिंग धिल्लन, हेमलता मिनरल्सचे संचालक मल्लिकार्जुन रेड्डी व पोलीस पाटील राजू सडमेक या तिघांची गेल्या १२ जूनच्या रात्री नक्षलवाद्यांनी हत्या केली. आधी चर्चेसाठी बोलावून नंतर हत्या करण्याचा प्रकार नक्षलवाद्यांकडून पहिल्यांदाच घडला आहे. या घटनेनंतर तीन दिवसांनी पोलिसांनी शिवाजी ऊर्फ चैतू पदा या जहाल नक्षलवाद्याला याच परिसरातून अटक केली. त्याच्या चौकशीतून हत्याकांडाच्या वेळी नेमके काय घडले याविषयीची बरीच माहिती पोलिसांना मिळाली असली, तरी या घटनेमागील कारणाचा शोध मात्र अजून लागलेला नाही. नक्षलवाद्यांच्या शस्त्र शाखेचा सदस्य असलेल्या शिवाजीच्या सांगण्यानुसार, या तिघांना मारण्याचा निर्णय त्या वेळी तेथे हजर असलेला दक्षिण गडचिरोलीचा विभागीय सचिव ऐतूने घेतला. या तिघांवर गोळय़ा झाडणाऱ्यांमध्ये गट्टा दलमचा कमांडर गोगलू, कसनसूर दलमचा कमांडर महेश व शस्त्र शाखेचा कमांडर सन्नूचा समावेश होता, असे शिवाजीचे म्हणणे आहे. नक्षलवाद्यांनी आधी या तिघांशी जंगलात चर्चा केली व नंतर त्यांना सर्वासमक्ष आणून ठार मारण्यात आले.
या चर्चेत नेमके काय घडले याचा तपशील ठाऊक नाही, असे शिवाजीचे म्हणणे आहे. लॉयड स्टीलचे अधिकारी भेटण्याचा निरोप आल्यानंतर एक कोटी रुपयांची रक्कम सोबत घेऊन गेले होते, अशी माहिती या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी समोर आली. शिवाजीच्या म्हणण्यानुसार या अधिकाऱ्यांकडे दोन बॅगा होत्या. त्यापैकी एका बॅगेत पुस्तके होती. दुसऱ्या बॅगेत नेमके काय होते ते ठाऊक नाही. याच बॅगेत खंडणीची रक्कम असावी, असा पोलिसांचा संशय आहे. या अधिकाऱ्यांच्या नक्षलवाद्यांसोबतच्या आधीच्या बैठकी सूरजागडचे पोलीस पाटील राजू सडमेक यांच्याच मध्यस्थीने घडून आल्या होत्या. सडमेक पोलीस पाटील असले तरी ते नेहमी नक्षलवाद्यांना मदत करत होते. त्यामुळे दोन अधिकाऱ्यांसोबत त्यांनाही ठार मारण्याचे नेमके कारण काय असा प्रश्न आता अधिकाऱ्यांना पडला आहे.
हिंसेची नवीन पद्धत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अधिकाऱ्यांना खंडणीची रक्कम सोबत घेऊन या, असा निरोप नक्षलवाद्यांनी सडमेक यांच्यामार्फतच दिला होता. या दोघांना ठार केल्यानंतर सडमेक यांना जिवंत सोडले तर पोलीस चौकशीत खंडणीची बाब समोर येईल, हे लक्षात आल्यानंतर नक्षलवाद्यांनी आजवर मदत करणाऱ्या त्यांच्या समर्थकालासुद्धा ठार मारण्याचा निर्णय घेतला. नक्षलवाद्यांची ही हिंसेची पद्धत नवीन असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा