शहरी भागात चळवळ रुजवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वर्णन गोन्सालवीस व श्रीधर श्रीनिवासन या दोन जहाल नक्षलवाद्यांना मंगळवारी नागपूरच्या सत्र न्यायालयाने बेकायदेशीर संघटनेला मदत करण्याच्या आरोपावरून दोषी ठरवत अनुक्रमे पाच व सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. गेल्या २० वर्षांंपासून चळवळीत सक्रिय असलेल्या दोन कुप्रसिद्ध नक्षलवाद्यांना शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
वर्णन आणि श्रीधर या दोघांना २००७ मध्ये राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने मुंबईतील काळाचौकी परिसरातून अटक केली होती. या दोघांकडे हातबॉंब आणि नक्षलवादी चळवळीचे प्रचार साहित्य मोठय़ा प्रमाणावर सापडले होते. हे दोघे तसेच सध्या तुरुंगात असलेल्या अँजेला सोनटक्केविरुद्ध शस्त्रास्त्र, स्फोटके, देशविरोधी कारवाया तसेच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या नागपूरच्या कारागृहात असलेल्या या दोघांविरुद्ध विदर्भात एकूण १२ प्रकरणे न्यायालयात सुरू आहेत. त्याचा आधार घेत या दोन्ही आरोपींनी मुंबईत दहशतवादविरोधी पथकाने दाखल केलेला खटला नागपूरला वर्ग करण्यात यावा अशी विनंती उच्च न्यायालयाला केली होती. न्यायालयाच्या आदेशावरून या दोघांविरुद्धचा खटला नागपुरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एम. जुनेदार यांच्या न्यायालयात स्थानांतरित करण्यात आला होता. या खटल्यात सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून प्रशांत सत्यनाथन यांची नेमणूक केली होती. हे दोघे गेल्या सहा वषार्ंपासून तुरुंगात असल्याने मंगळवारी झालेली शिक्षा त्यांनी आधीच भोगलेली आहे. आता या दोघांविरुद्ध सुरू असलेल्या इतर प्रकरणांत काय होते, याकडे न्यायालयाचे लक्ष लागले आहे.
श्रीधरला भारतीय शस्त्रास्त्रे कायद्यान्वये तीन वर्षांची, तर स्फोटके बाळगल्याच्या आरोपावरून सहा वर्षांची शिक्षा तसेच दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. या दोघांना बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कायद्यान्वये दोन वर्षांची, तर याच कायद्यातील कलम १३ अन्वये पाच वर्षांची शिक्षा मंगळवारी ठोठावण्यात आली. गनिमी पद्धतीने नक्षलवादी हिंसक कारवाया करीत असल्याने पोलिसांकडून गुन्हे दाखल केल्यानंतर आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. या पाश्र्वभूमीवर या दोघांना शिक्षा झाल्याने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. वर्णन व श्रीधर यांनी नक्षलवाद्यांच्या राज्य समितीचे सचिव म्हणूनसुद्धा काम केले आहे. नव्वदच्या दशकात या भागात सक्रिय असलेल्या या दोघांनी नंतर मुंबईत स्थलांतर केले होते.
विदर्भातील दोन नक्षलवाद्यांना कारावास
शहरी भागात चळवळ रुजवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वर्णन गोन्सालवीस व श्रीधर श्रीनिवासन या दोन जहाल नक्षलवाद्यांना मंगळवारी नागपूरच्या सत्र न्यायालयाने बेकायदेशीर संघटनेला मदत करण्याच्या आरोपावरून दोषी ठरवत अनुक्रमे पाच व सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.
First published on: 26-06-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxal leaders gonsalves srinivasan convicted by nagpur court