नक्षलवादी चळवळीत सक्रिय असल्याच्या आरोपावरून पोलिसांच्या रडारवर आलेले दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक साईबाबा यांनी आता जबाब नोंदवण्याच्या मुद्यावरून पोलिसांसमोर कायदेशीर पेच निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जबाबाच्या निमित्ताने गडचिरोली पोलिसांना दिल्लीत बोलावून त्यांच्यापुढे निदर्शने करण्याचे डावपेच या चळवळीच्या समर्थकांकडून सध्या आखले जात आहेत.
गडचिरोली पोलिसांनी दहा दिवसापूर्वी दिल्लीतील रामलाल आनंद महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक जी. एल. साईबाबा यांच्या विद्यापीठ परिसरातील निवासस्थानी छापा घालून नक्षलवादी चळवळीशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या हेम मिश्रा व प्रशांत राही ऊर्फ सांगलीकर या दोघांच्या जबाबातून साईबाबा यांचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती. या कारवाईच्या विरोधात साईबाबा यांनी दिल्लीत बरेच आकांडतांडव केले. त्यांच्या समर्थनार्थ काही विद्यार्थ्यांनी जंतरमंतरवर निदर्शने केली, तर विद्यापीठातील प्राध्यापक संघटनेने केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना निवेदन देऊन पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला होता. आता साईबाबा यांच्या घरातून जप्त केलेल्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार साईबाबा यांना नोटीस बजावण्यात आली.
या नोटिशीला उत्तर देतांना साईबाबा यांनी ते अपंग असल्यामुळे पोलिसांनी दिल्लीत येऊन माझा जबाब नोंदवावा असे पत्र पोलिसांना दिले. अपंग व्यक्तींचे जबाब त्यांच्या घरी जाऊन नोंदवण्यात यावे असे कायद्यात नमूद आहे असा दावा साईबाबा यांनी या पत्रात केला होता. त्याला उत्तर देताना पोलिसांनी केवळ १५ वर्षांखालील मुले आणि स्त्रियांचा जबाब त्यांच्या घरी नोंदवून घेण्याची कायद्यात तरतूद आहे. अपंगांसाठी अशी तरतूद नाही, असे साईबाबा यांना कळवले होते. त्यावर पुन्हा साईबाबा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालांचा दाखला देत अपंगांसाठीसुद्धा आता कायद्यात अशी तरतूद करण्यात आली आहे, असे पत्र नव्याने पोलिसांना दिले आहे. या पत्राचा आधार घेत आता पोलिसांनी पुन्हा एकदा कायद्याची पुस्तके चाळण्याचा निर्णय घेतला आहे.
जबाब कुठे नोंदवून घ्यायचा याबाबतचा निर्णय अद्याप पोलिसांकडून झालेला नसतानासुद्धा साईबाबा रोज तपास अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून दिल्लीत जबाब देण्यास तयार आहेत असे सांगत आहेत. पोलिसांनी साईबाबा यांच्या घराची झडती घेतली तेव्हा या चळवळीच्या दिल्लीतील समर्थकांनी तीव्र निदर्शने केली होती. या माध्यमातून राष्ट्रीय प्रसार माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न झाला. आताही पोलीस दिल्लीत गेले तर या समर्थकांकडून तसेच डावपेच आखले जाण्याची शक्यता आहे. शिवाय पोलिसांना साईबाबा यांचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर त्यांना सध्या अटकेत असलेल्या हेम मिश्रा व प्रशांत राही यांच्यासमोर बसवायचे आहे. या तिघांची एकत्रितपणे चौकशी केली तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकतो असे पोलिसांचे म्हणणे आहे. साईबाबा यांना नेमके तेच टाळायचे आहे. म्हणून त्यांनी कायद्यातील तरतुदीचा आधार घेत पोलिसांना दिल्लीत बोलावण्याचा आग्रह धरला आहे. हेम मिश्रा व प्रशांत राही यांना दिल्लीत नेण्याचा पर्याय पोलिसांकडे उपलब्ध आहे. तसे केले तर नक्षलवाद्यांचे समर्थक दिल्लीत आणखी गदारोळ करतील, अशी भीती पोलिसांच्या वर्तुळात व्यक्त होत आहे.

Story img Loader