साईनाथ हा पेरमिली येथील आश्रमशाळेत नववीपर्यंत शिकलेला असून तो व्हॉलीबॉलचा उत्कृष्ट खेळाडू आहे, तसेच त्याचे हस्ताक्षरही सुंदर आहे. २००४ मध्ये दिवाळीच्या सुट्टीत तो आपल्या गावी गट्टेपल्ली येथे आल्यावर त्याचा संपर्क सध्या आत्मसमर्पित डीव्हीसी शेखर याच्याशी आला व त्यानंतर साईनाथचे हस्ताक्षर सुंदर असल्यामुळे त्याला नक्षलवाद्यांचे बॅनर व पत्रके इत्यादी लिहून घेण्याचे काम देण्यात आले. त्यानंतर तो अलगद नक्षलवादी चळवळीत सामील झाला. खरे तर त्याला भरपूर शिकून शिक्षक व्हायचे होते. कुटुंबासोबत सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगावे, अशी त्याची व आमची इच्छा होती, पण ती इच्छा अपूर्णच राहिली, अशी खंत साईनाथची आई व काकांनी पोलिसांजवळ व्यक्त केली.
सध्या नक्षलवाद्यांच्या पेरमिली दलमचा कमांडर असलेल्या साईनाथ ऊर्फ डोलेश मादी आत्राम (२७) यांच्या कुटुंबीयांची अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक राहुल श्रीरामे व अन्य अधिकाऱ्यांनी अहेरी तालुक्यातील दुर्गम अशा गट्टेपल्ली या गावात घरी जाऊन भेट घेतल्यावर ही माहिती समोर आली.
नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणास प्रोत्साहित करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलातर्फे नवजीवन मोहीम हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या मोहिमेंतर्गत पोलीस अधिकारी नक्षलवाद्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत, तसेच त्यांना आत्मसमर्पण योजनेची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक राहुल श्रीरामे यांनी आपल्या ताफ्यासह पेरमिली दलम कमांडर साईनाथ ऊर्फ डोलेश मादी आत्राम याच्या गट्टेपल्ली गावातील घरी जाऊन त्याचे काका डुंगा इरपा आत्राम, आई तानी मादी आत्राम व बहीण मोली मादी आत्राम यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी शासनाची आत्मसमर्पण योजनाही त्यांना समजावून सांगितली. कुटुंबीयांना कपडे व मिठाई भेट दिली.
यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक राहुल श्रीरामे यांनी पोलीस मदत केंद्र ताडगाव अंतर्गत धुळेपल्ली येथील पेरमिली दलमचा उपकमांडर देवू डुंगा आत्राम ऊर्फ देवू गोमजी गावडे याच्या घरी जाऊन त्याचे वडील डुंगा सैतू आत्राम व आई कुकडे डुंगा आत्राम यांचीही भेट घेतली व होळीनिमित्त कपडे व मिठाई भेट दिली, तसेच जिंजगाव येथील दक्षिण गडचिरोली सीएनएमचा कमांडर रमेश ऊर्फ नरेश ऊर्फ राजू कुकडे वेलादी, टेलर टीमचा कमांडर किशोर ऊर्फ रिजत बापू नैताम, सदस्य सविता पपया नैताम, सिरोंचा एलजीएस उपकमांडर टिब्रू ऊर्फ मोहनसाई नरसय्या पेंदाम, सीएनएम सदस्य अरुण येर्रा तलांडी यांच्याही घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना आत्मसमर्पण योजनेची माहिती दिली. विक्रमच्या मुलीची व्यथा
माझ्या बाबांची मला खूप आठवण येते. त्यांना घेऊन या ना, अशी व्यथा नक्षलवादी विक्रमच्या लहान मुलीने पोलिसांसमोर गोंडी भाषेत मांडली. नवजीवन मोहिमेअंतर्गत धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी नक्षलवाद्यांच्या कंपनी १०चा डॉक्टर असलेल्या विक्रम तुलावी यांच्या धानोरा तालुक्यातील गुरुकेसा येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असता विक्रमच्या लहान मुलीने आपली व्यथा मांडली. घरी विक्रमची आई, भाऊ, बहीण, वहिनी आणि लहान मुलगी उपस्थित होते. विक्रमने जंगलात जाऊच नये, अशी इच्छा त्याच्या भावाने व्यक्त केली. आईची प्रकृती नेहमी खराब असते, तसेच त्याला लहान मुलगी आहे. याकडे त्याने लक्ष दिले पाहिजे, असे त्याची बहीण व वहिनी म्हणाली. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बांगर यांनी विक्रमच्या कुटुंबीयांना आत्मसमर्पण योजना समजावून सांगितली आणि त्याने आत्मसमर्पण केल्यास शासनाच्या सर्व सुविधा व सन्मानाची वागणूक मिळेल, असे आश्वासन दिले. होळीच्या निमित्ताने भेट देऊन विक्रमच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.
नक्षलवादी साईनाथची शिक्षक होण्याची इच्छा अपूर्णच
साईनाथ हा पेरमिली येथील आश्रमशाळेत नववीपर्यंत शिकलेला असून तो व्हॉलीबॉलचा उत्कृष्ट खेळाडू आहे, तसेच त्याचे हस्ताक्षरही सुंदर आहे. २००४ मध्ये दिवाळीच्या सुट्टीत तो आपल्या गावी गट्टेपल्ली येथे आल्यावर त्याचा संपर्क सध्या आत्मसमर्पित डीव्हीसी शेखर याच्याशी आला व त्यानंतर साईनाथचे हस्ताक्षर सुंदर असल्यामुळे त्याला नक्षलवाद्यांचे बॅनर व पत्रके इत्यादी लिहून घेण्याचे काम देण्यात आले.
First published on: 07-04-2013 at 01:27 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxal sainath wish of becoming teacher remain incomplete