पोलिसांच्या कारवाईनंतर जामिनावर सुटलेल्या राज्यभरातील नक्षलवादी समर्थकांनी पुन्हा एकदा दलित तरुणांना चळवळीत सामील करून घेण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या दरम्यान आयोजित होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात सरकारविरुद्ध सशस्त्र उठावाची भाषा करणाऱ्या या समर्थकांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी सूचना गुप्तचर यंत्रणेने पोलिसांना केली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू झालेल्या ग्रीन हंट मोहिमेमुळे आजवर जंगलात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांवर बरेच नियंत्रण आले आहे. यावर उपाय म्हणून आता नक्षलवाद्यांच्या केंद्रीय नेतृत्वाने शहरी भागात चळवळ रुजवण्यासाठी जोरदार प्रयत्न करा, असे संदेश त्यांच्या समर्थकांना दिले आहेत. अलीकडच्या काही वर्षांत या समर्थकांनी पुण्यातील कबीर कलामंचच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले होते. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने या मंचच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला होता. आता जामिनावर सुटलेल्या याच कार्यकर्त्यांनी पुन्हा डॉ. आंबेडकरांचे नाव समोर करून दलित तरुणांना संघटित करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू केला आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्य़ातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली गावात या समर्थकांनी एक शिबीर घेतले. यात सरकार विरुद्ध सशस्त्र उठावाची भाषा करण्यात आली. याच शिबिरात ‘जयभीम कॉम्रेड’ या लघुपटाच्या चित्रफितीही वितरित करण्यात आल्या. या शिबिरातून प्रशिक्षित झालेल्या तरुणांना नंतर मुंबई व पुण्यात पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले.
पोलिसांच्या कारवाईनंतर जामिनावर सुटलेल्या नक्षलवादी समर्थकांवर पोलिसांची नजर राहील, हे लक्षात आल्यामुळे या नव्या मोहिमेत आणखी काही नवीन कार्यकर्त्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. या मोहिमेच्या दरम्यान आखण्यात येणाऱ्या अनेक कार्यक्रमांमध्ये विद्रोही कवी व शाहीर संभाजी भगत यांना समोर करण्यात येत आहे. भगत यांच्यावर नक्षलवाद्यांचे समर्थक असल्याच्या आरोपावरून नागपुरात काही गुन्हे दाखल आहेत. गुप्तचर यंत्रणांनी या सर्व घडामोडींची माहिती राज्यातील पोलिसांना दिली आहे.
दलित तरुणांची संघटनात्मक बांधणी करतांना इतर शोषित समाजापासून ते वेगळे पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी, तसेच या संघटनांच्या माध्यमातून आजवर दलित समाजाचा राजकीय कारणांसाठी वापर करून घेणाऱ्या नेत्यांच्या ढोंगीपणाचा बुरखा फाडावा, अशाही सूचना या समर्थकांना केंद्रीय नेतृत्वाकडून देण्यात आल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर राज्यभरात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनातही अनेक नक्षलवादी समर्थक सहभागी झाले होते. ही आंदोलने हिंसक व्हावीत यासाठी या समर्थकांनी प्रयत्न केले होते, असे गुप्तचर यंत्रणेने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा