नऊ महिन्यांत ६४ जण ठार, सहा दलमचा सफाया

गडचिरोली : ४८ तासात ३९ तर नऊ महिन्यात ६४ नक्षलवादी ठार झाल्याने व सहा नक्षल दलमचा सफाया झाल्याने  जिल्हय़ात नक्षल चळवळ खिळखिळी झाली आहे. परिणामी, छत्तीसगड व महाराष्ट्रातील नक्षल चळवळीची प्रमुख नर्मदा व जोगन्ना यांच्यावर नक्षल चळवळीला नव्याने सावरण्याचे, दलम सक्रिय करण्याचे, चळवळीतील तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन उभे ठाकले आहे.

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर बोरियाच्या जंगलात रविवारी झालेल्या चकमकीत मृत पावलेल्या नक्षलवाद्यांचा आकडा ३३ वर गेला आहे, तर याच दरम्यान अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येथे चकमकीत सहा नक्षलवादी मारले गेले. ४८ तासात एकूण ३९ नक्षलवादी ठार झाले. गेल्या नऊ महिन्यांचा विचार केला तर गडचिरोली पोलिसांनी  ६४ नक्षलवाद्यांना ठार करत नक्षल्यांची एक कंपनी व पाच दलम उद्ध्वस्त केली आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच एका चकमकीत इतक्या मोठय़ा संख्येने नक्षलवादी ठार होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे नक्षलवादी हादरले आहेत. अगोदरच नक्षल चळवळीचे आकर्षण संपल्यामुळे तरुण चळवळीत सहभागी होत नसल्याची चिंता नक्षली नेत्यांना आहे. त्यात एकाच वेळी ३९ जण ठार झाल्याने चळवळीतील मनुष्यबळ कमी झाले. ते वाढविण्यासोबतच नव्याने दलम सक्रिय करण्याचे आवाहन छत्तीसगड व महाराष्ट्राचे नक्षल चळवळीचे प्रभारी नर्मदा व जोगन्ना या दोन जहाल नक्षलवाद्यांवर आहे.

सध्या सिरोंचा, पेरीमिली, चामोर्शी, कसनसूर, कुरखेडा हे दलम पूर्णत: संपुष्टात आले, असा पोलीस दलाचा दावा आहे. त्यातच श्रीणू, साईनाथ व नंदू या तीन विभागीय समिती सदस्यांसोबतच तीन नक्षल कमांडरही ठार झाले. त्यामुळे नर्मदा व जोगन्नासमोरील सर्वात पहिले आव्हान हे या तिन्ही विभागीय समिती सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची नियुक्ती करणे, त्यानंतर उद्ध्वस्त दलमला सक्रिय करून कमांडरची निवड करणे, चळवळीत नवीन तरुणांना सहभागी करून घेणे तसेच आत्मविश्वास व उत्साह निर्माण करणे हे आहे.

श्रीणूच्या मृत्यूचा सर्वाधिक धक्का

बोरियाच्या चकमकीत ठार झालेला  विभागीय समितीचा सचिव श्रीणूचा सर्वाधिक धक्का वरिष्ठ नक्षली नेत्यांना बसला आहे. श्रीणू हा तेलंगणा राज्यातील छल्लगारी येथील रहिवासी होता. २००३ मध्ये सिरोंचा एलओएसचा सदस्य म्हणून चळवळीत सहभागी झाला. त्याची एसीएम व डीसीएम म्हणून पदोन्नती झाली होती. चळवळीत त्याने वरिष्ठांचा विश्वास संपादन केला होता. चळवळ वाढीसाठी त्याने अथक परिश्रम घेतले. त्यामुळे त्याच्या मृत्यूचा सर्वाधिक धक्का नक्षल्यांना बसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गडचिरोलीची जबाबदारी गिरीधरकडे?

सध्या उत्तर गडचिरोलीची जबाबदारी सांभाळणाऱ्या जहाल नक्षलवादी गिरीधर याच्याकडे आता संपूर्ण जिल्हय़ाची सूत्रे सोपवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. गिरीधर हा अगदी सुरुवातीच्या काळापासून चळवळीत आहे. सदस्य, कमांडर व उत्तर गडचिरोली विभाग प्रमुख असा त्याचा प्रवास आहे.

Story img Loader