सत्यतेविषयी पोलिसांचा तपास
गडचिरोली : कुरखेडा भूसुरुंगस्फोट घटनाक्रमाची माहिती दिल्याबद्दल नक्षलवाद्यांनी प्रफुल्ल पिल्लावान या व्यक्तीचे जाहीर आभार मानले आहे. कुरखेडा-कढोली मार्गावर वाघोबा देवस्थानाजवळ एक संदेश रस्त्यावर पांढऱ्या अक्षरात लिहिलेला असून त्यात आभार मानले आहे. मात्र, हा खरच नक्षल्यांचा संदेश आहे की व्यक्तिगत द्वेषातून लिहिला आहे, याची चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीपासून नक्षलवादी अधिक सक्रिय झाल्याचे दिसत असून कुरखेडा भूसुरुंगस्फोटात १५ पोलीस शहीद झाले. याबाबतच्या घटनाक्रमाची माहिती आम्हाला एका खबऱ्याने पुरवली असून त्याचे आम्ही आभार मानतो, असा मजकूर रस्त्यावर लिहिला आहे. या संदेशात प्रफुल्ल पिल्लावान, वडसा आम्ही कुरखेडा बॉम्बस्फोट यशस्वी केला आहे. अशीच आम्हाला माहिती देत राहा, लाल सलाम, अशाप्रकारचा मजकूर आला आहे. यामुळे आता प्रफुल्ल पिल्लावान हा कोण आहे आणि हा मजकूर लिहिला कोणी, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. नक्षली आपल्याच खबऱ्यांचा असा खुलेआम उल्लेख करत नाहीत. त्यामुळे एखाद्या व्यक्तिगत रागातून हा मजकूर लिहिला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात गडचिरोली-गोंदियाचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे म्हणाले की, रस्त्यावरील मजकुराची सत्यता आम्ही पडताळून पाहत आहोत. स्वत: पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे या सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणाचा अतिशय जलद गतीने तपास सुरू आहे.