सुशीलकुमार शिंदे यांचा दावा
छत्तीसगड, बिहार आणि गडचिरोलीत होणारे हल्ले केवळ नैराश्यातून होत असून, आपल्या कार्यकाळात नक्षलवाद्यांचे हल्ले घटल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे बोलताना केला.
सोलापूरजवळ धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथे काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या गोकुळ साखर कारखान्याच्या पायाभरणी समारंभासाठी शिंदे आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बातचीत करताना त्यांनी हा दावा केला. देशात दररोज कुठे ना कुठे नक्षली हल्ले होत आहेत. छत्तीसगडपाठोपाठ नुकतेच बिहारमध्ये रेल्वेवर, तर गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी मोठे हल्ले केले आहेत. या पाश्र्वभूमीवर विचारणा केली असता शिंदे यांनी सांगितले की, या वाढत्या हल्ल्यांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून नक्षलवादास पायबंद घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येत आहेत. मोदींच्या निवडीबाबत त्यांना विचारले असता, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याची काँग्रेसला अजिबात भीती वाटत नाही. मोदी हे मागचापुढचा विचार न करता आक्रमक विधाने करतात. त्यामुळे ते स्वत:समोर पेच निर्माण करतात आणि देशासमोरील प्रश्नांची सोडवणूक करण्यातही अडचणी निर्माण करतात, असा आरोप त्यांनी केला. आगामी लोकसभा निवडणूक आपण लढविणार नाही. त्याबाबतचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींना यापूर्वीच कळविला आहे. मात्र त्यावर पक्षश्रेष्ठी देतील तो निर्णय आपण मान्य करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा