अलीकडच्या काही वर्षांत छत्तीसगडचा अपवाद वगळता इतर राज्यांत मनुष्यबळाची कमतरता अनुभवणाऱ्या नक्षलवाद्यांनी आता हिंसक कारवायांसाठी अल्पवयीन मुला-मुलींचा वापर करणे सुरू केले आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या राजकीय हत्यांमध्ये नक्षलवाद्यांनी जाणीवपूर्वक या मुलांना समोर केल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या आठवडय़ात पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्हय़ात नक्षलवादी तैमुल गावात नक्षलवाद्यांची बैठक सुरू असताना पोलिसांनी त्यांना घेरले. यानंतर जोरदार चकमक झाली. नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले असले तरी नक्षलवाद्यांसोबत असलेल्या चार मुलींना जवळच्या महाका गावात ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले. राणी, बायजा, लक्ष्मी व किशोरिका, अशी नावे असलेल्या या मुलींपैकी लक्ष्मीचा अपवाद वगळता इतर तीनही मुली अल्पवयीन आहेत. १३ ते १५ या वयोगटातल्या या मुली चकमक सुरू झाल्यानंतर नक्षलवाद्यांसोबत पळून जाऊ शकल्या नाहीत. अखेर त्यांनी महाका गावात आश्रय घेतला. या मुलींजवळील तीन भरमार बंदुकासुद्धा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. नक्षलवाद्यांनीसुद्धा या मुलींना वाऱ्यावर सोडून दिले. या मुली गडचिरोली जिल्हय़ातील लवारी गावच्या आहेत. सहा महिन्यांपूर्वी नक्षलवादी या गावात आले व त्यांनी जबरदस्तीने सहा मुलींना नेले. यापैकी पाच मुली अल्पवयीन होत्या. मनुष्यबळाची कमतरता अनुभवणाऱ्या नक्षलवाद्यांनी आता जाणीवपूर्वक किशोरवयातील मुला-मुलींना चळवळीत ओढणे सुरू केले असून चळवळीसाठी बालकांचा तसेच अल्पवयीन मुलांचा वापर करणे ही नवीन बाब नाही. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी ‘बाल दस्ते’ या नावाखाली मुलांना चळवळीत आणले आहे. नक्षलवाद्यांच्या या कृत्याची संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालातसुद्धा दखल घेण्यात आली असून अलीकडे तरुणांचा चळवळीकडे असलेला कल कमी झाल्याने नक्षलवाद्यांनी जाणीवपूर्वक मुलांवर लक्ष केंद्रित करत आहे. शेजारच्या छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांना मनुष्यबळाची कमतरता नाही. इतर राज्यात मात्र तरुण या चळवळीपासून दूर जात आहेत. गेल्या दोन वर्षांत छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी सुमारे ३३ हजारांचे मनुष्यबळ चळवळीशी जोडले. यात प्रामुख्याने अल्पवयीन मुलांचा भरणा असल्याचे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या जानेवारीपासून नक्षलवाद्यांनी शेजारच्या गडचिरोली जिल्हय़ात राजकारण्यांना लक्ष्य केले. या बहुसंख्य हत्यांमध्ये नक्षलवाद्यांनी अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. भामरागडचे काँग्रेसचे नेते बहादूरशाह आलाम व एटापल्लीचे राष्ट्रवादीचे नेते केवल अतकमवार यांना ठार मारणारे नक्षलवादी म्हणजे १३ ते १५ वयोगटातील अल्पवयीन मुले होती. या अल्पवयीन मुलांना चळवळीविषयी कोणतीही माहिती नसल्याचे चौकशीत आढळल्याचे गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
या अल्पवयीन मुलांना अटक केली तरी त्यांना बालगुन्हेगार म्हणून वागणूक द्यावी लागते. कायद्यानुसार चौकशीनंतर त्यांची बालसुधारगृहात रवानगी करावी लागते. तेथे त्यांचे पालक या मुलांना परत मागू शकतात. त्यामुळे पोलिसांसमोर एक नवीनच संकट उभे ठाकले आहे.
नक्षलवाद्यांचे आता ‘बाल दस्ते’
अलीकडच्या काही वर्षांत छत्तीसगडचा अपवाद वगळता इतर राज्यांत मनुष्यबळाची कमतरता अनुभवणाऱ्या नक्षलवाद्यांनी आता हिंसक कारवायांसाठी अल्पवयीन मुला-मुलींचा वापर करणे सुरू केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-10-2012 at 07:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxalite involing underage boys and girls