रवींद्र जुनारकर

नर्मदाक्का, किरणकुमार या नक्षलवादी नेत्यांच्या अटकेबरोबर दंडकारण्यातील पोलीस कारवाईत ९६ नक्षलवादी ठार झाल्याने नक्षल दलम अडचणीत आल्याची कबुली भारतीय कम्युनिस्ट पार्टीने छत्तीसगड, एटापल्ली भागात वितरित केलेल्या पत्रकात दिली आहे. मात्र, तरीही २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

नक्षलवादी चळवळीचे संस्थापक चारू मुजुमदार आणि मार्गदर्शक कन्हाई चॅटर्जी यांच्या स्मरणार्थ देशात चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात नक्षलवादी शहीद सप्ताह साजरा करतात. हिंसक कृत्ये करून सरकार विरोधात जास्तीत जास्त असंतोष घडवून आणणे हा यामागचा उद्देश. यंदा गडचिरोली परिसरातील नागरिकांनी सप्ताहात सामील व्हावे यासाठी पत्रके, बॅनर्सचा वापर करण्यात आला आहे. एटापल्ली तालुक्यातील जाराबंडी भागात मिळालेल्या पत्रकात नक्षली आंदोलनाचा आढावा घेण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत नागरिक नक्षली दलमपासून दूर राहावेत यासाठी पोलिसांनी प्रयत्न केल्याची कबुली भारतीय कम्युनिस्ट पार्टी-माओवादी दक्षिण सब झोनल ब्युरोने काढलेल्या पत्रकात दिली आहे.

‘समाधान’ला विरोधाचे आवाहन

सध्या केंद्रीय गृह विभाग नक्षलवादी आंदोलन मोडून काढण्यासाठी समाधान नावाचे अभियान राबवत आहे. या अभियानाला विरोध करण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी पत्रकातून जनतेला केले आहे. पोलिसांच्या आक्रमक धोरणांमुळे वर्षांत देशामध्ये ११९ तर दंडकारण्यात  ९६ नक्षलवादी मारले गेल्याचे पत्रकात म्हटले आहे.

यात ३५ महिला आहेत. पोलिसांच्या परिणामकारक पावित्र्यामुळे नक्षल दलम अडचणीत असल्याची स्पष्ट कबुली नक्षलवाद्यांनी दिली आहे.

Story img Loader