गेल्या जून महिन्यात रूग्णवाहिकेत सापडलेली शस्त्रे व औषधे आपल्याच सूचनेवरून नक्षलवाद्यांना पोहचवली जात होती. या भागात तेंदूपानाचा व्यवसाय करायचा असेल तर नक्षलवाद्यांना ’मॅनेज’ करावेच लागते, अशी स्पष्ट कबुली काँग्रेसचे नेते बंडोपंत मल्लेलवार यांनी पोलिसांना दिली आहे. सध्या कोठडीत असलेल्या मल्लेलवारांच्या या कबुली जबाबामुळे काँग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
गेल्या २१ जून ला भामरागड पोलिसांनी सार्वजनिक आरोग्य खात्याच्या एका रूग्णवाहिकेतून मोठा शस्त्र साठा व औषधे जप्त केली होती. या रूग्णवाहिकेत असलेल्या चौघांना अटक केल्यानंतर हा साठा काँग्रेस नेते बंडोपंत मल्लेलवार यांच्या सूचनेवरून नक्षलवाद्यांना पोहचवला जात होता अशी माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी या नेत्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून फरार असलेले मल्लेलवार अखेर उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर गेल्या ७ ऑगस्टला पोलिसांसमोर शरण आले. दोन दिवस प्रकृतीच्या कारणावरून शासकीय रूग्णालयात काढल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. सध्या ५ दिवसाच्या पोलीस कोठडीत असलेल्या मल्लेलवारांकडून मिळालेली माहिती धक्कादायक आहे. एटापल्ली तालुक्यातील गट्टा दलमचा कमांडर गोगलूने मल्लेलवारांना शस्त्रे, औषधे व इतर साहित्याचा पुरवठा करण्यासाठी जून महिन्याच्या प्रारंभी निरोप पाठवला होता.
तेंदूपाने संकलन करण्याचा हंगाम संपल्यानंतर खंडणीचा हिशेब पूर्ण करणे तसेच सोबत या साहित्याचा पुरवठा करण्याची सूचना मल्लेलवारांना नक्षलवाद्यांकडून देण्यात आली होती. हा निरोप मिळताच मल्लेलवारांनी शस्त्रे व औषधी पुरवठय़ासाठी कुणालाही संशय येऊ नये म्हणून राजकीय वजन वापरून आरोग्य खात्याच्या रूग्णवाहिकेचा वापर करण्याचा निर्णय घेतला. मल्लेलवारांच्या प्रत्येक कृतीवर पाळत ठेऊन असलेल्या पोलिसांनी हा साठा पकडला. आता कोठडीत असलेल्या मल्लेलवारांनी चौकशीच्या दरम्यान या सर्व व्यवहाराची स्पष्ट कबुली दिल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आज लोकसत्ताशी बोलताना दिली. या भागात तेंदूपाने संकलनाचा व्यवसाय करताना नक्षलवाद्यांना मॅनेज करावे लागते, असेही या काँग्रेसच्या नेत्याने चौकशीत कबूल केले आहे. या भागात हा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची संघटना आहे. नक्षलवादी या संघटनेला दरवर्षी खंडणीचे लक्ष्य देत असतात. संघटनेचे पदाधिकारी कुणीही असले तरी स्थानिक व्यापारी म्हणून खंडणीचा हा व्यवहार पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर असते असेही मल्लेलवारांनी पोलिसांसमोर कबूल केले आहे. नक्षलवाद्यांना खंडणी दिली नाही तर तेंदूपाने संकलन होऊच शकत नाही, कारण या भागातील परिस्थितीच तशी आहे असा युक्तीवाद मल्लेलवार पोलिसांसमोर करत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. अलीकडच्या काळात नक्षलवादी रोख रकमेसोबत शस्त्रे व इतर साहित्याचे सुद्धा मागणी करू लागले आहेत. त्यामुळे त्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असेही या नेत्याने पोलिसांसमोर कबूल केले आहे. मल्लेलवारांच्या या कबुली जबाबाविषयी पोलीस अधिकारी उघडपणे बोलण्यास तयार नसले तरी या प्रकरणामुळे राज्यात काँग्रेस पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. छत्तीसगडच्या घटनेनंतर नक्षलवाद्यांविरूद्ध ठोस कारवाईची भाषा करणाऱ्या या पक्षाचे स्थानिक नेतेच नक्षलवाद्यांशी संधान साधून असल्याचे स्पष्ट झाल्याने विरोधी पक्षाकडून येत्या काळात या मुद्यावरून मोठे भांडवल केले जाण्याची शक्यता आहे.
मल्लेलवारांच्या कबुलीने काँग्रेस अडचणीत
गेल्या जून महिन्यात रूग्णवाहिकेत सापडलेली शस्त्रे व औषधे आपल्याच सूचनेवरून नक्षलवाद्यांना पोहचवली जात होती.
First published on: 13-08-2013 at 01:51 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxalite need to manage to do the business bandopant mallelwar