शेजारच्या छत्तीसगडमधील बस्तरला ‘लिबरेटेड झोन’चा दर्जा मिळवून देण्यासाठी या प्रदेशाला लागून असलेल्या विदर्भ, तेलंगणा व ओदिशाच्या सीमावर्ती भागात नक्षलवादी चळवळ अधिक मजबूत व सशक्त करण्याचा निर्णय नक्षलवाद्यांनी घेतला असून, त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात अबूजमाड पहाडावर झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत ‘लोकसत्ता’ला उपलब्ध झाला असून, त्यात नक्षलवाद्यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर भाष्य केले आहे.
गेल्या वर्षभरात देशभरातील नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया कमी झाल्याने केंद्र व राज्य पातळीवर समाधान व्यक्त केले जात असले; तरी नक्षलवादी मात्र चळवळीच्या मजबूत बांधणीसाठी अतिशय पद्धतशीरपणे कामाला लागले असल्याचे या बैठकीत झालेल्या चर्चेतून स्पष्ट झाले आहे. दंडकारण्य स्पेशल झोन समितीचा सचिव कोसा याच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला चळवळीच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य सोनूसुद्धा हजर होता. छत्तीसगड, आंध्र व विदर्भातील विविध कारागृहांत चळवळीचे सुमारे दोन हजार सदस्य खितपत पडले असून त्यांना साधी कायदेशीर मदतसुद्धा आपण पुरवू शकलो नाही याबद्दल या बैठकीत खंत व्यक्त करण्यात आल्याचे या कार्यवृत्तांतात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. बस्तरमध्ये चळवळीचे काम चांगले असले तरी या प्रदेशाला लिबरेटेड झोनचा दर्जा मिळवून देणे आता गरजेचे आहे. त्यासाठी बस्तरला लागून असलेल्या विदर्भ, तेलंगणा व ओरिसाच्या भागात चळवळ अधिक सशक्त करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. या तिन्ही प्रदेशांतील पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. शहरी भागात नव्याने संघटनेची बांधणी करण्याचा निर्णयसुद्धा या वेळी घेण्यात आला, तसेच देशातील फुटीरतावादी चळवळीच्या कामांवर चर्चा करण्यात आली. काश्मीर तसेच पूर्वेकडील राज्यांमधील चळवळींना सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. देशातील सत्ताधाऱ्यांकडून महिलांवर होत असलेल्या वाढत्या अत्याचारांचा निषेध करून, महिलांना चळवळीत अधिक सक्रिय करण्याचे या वेळी ठरवण्यात आले. याच बैठकीत कोसा याला केंद्रीय समितीत स्थान मिळाल्याने त्याच्या जागी कमांडर एक्सची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या कार्यवृत्तांतात या एक्सचे नाव नमूद करण्यात आलेले नाही.

बैठकीतील निर्णय..
* चळवळीच्या सशक्तीकरणासाठी महिलांना मोठय़ा प्रमाणावर सहभागी करून घेणे
* कडव्या हिंदुत्वाची झळ पोहोचलेल्या दलित, आदिवासींसह मागास जातीतील लोकांना जवळ करणे,
   अल्पसंख्याकांना सोबत घेणे
* लोकांचा सहभाग असलेली गुप्तचर  यंत्रणा उभी करणे
* संघटनेत आणखी समन्वय साधण्यासाठी राज्य व विभाग समितीत दुवा साधणारी प्रादेशिक समिती तयार करणे
* चळवळीच्या मुखपत्राचे नियमितपणे प्रकाशन करून त्याचे योग्य पद्धतीने वितरण करणे
* सध्या अतिशय कमकुवत असलेला व जनतेचा थेट सहभाग असलेला ‘मिलेशिया’ (लढाऊ पथक) आणखी
   मजबूत करणे, त्यांना थेट युद्धासाठी प्रशिक्षित करणे
* गनिमी युद्धाला फिरत्या युद्धात परावर्तित करणे