माहिती देणाऱ्यास २५ लाखांचे बक्षीस देणार
‘मोस्ट वान्टेड’ जहाल नक्षलवादी, केंद्रीय अ‍ॅक्शन टीमचा सदस्य, दंडकारण्य स्पेशल झोन समिती सदस्य थक्कलपल्ली वासुदेव राव उर्फ असन्ना उर्फ सतीश हा गडचिरोलीत हिंसा, जाळपोळ व हत्यासत्र घडवून आणण्यासाठी गडचिरोलीत दाखल झाला आहे. त्याची माहिती देणाऱ्याला आंध्र पोलिसांनी २५ लाखांचे तर गडचिरोली पोलिसांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.
 मूळचा आंध्रप्रदेशातील वरंगल येथील रहिवासी असलेला थक्कलपल्ली वासुदेव राव हा ४६ वर्षांचा आहे. वयाच्या १८ व्या वषार्र्पासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेल्या राव याला गडचिरोलीची सर्व माहिती आहे. आंध्र प्रदेशात ‘मोस्ट वान्टेड’ असलेला हा जहाल नक्षलवादी काही दिवसांपूर्वी गडचिरोलीत घातपात करण्याच्या हेतूने दाखल झाला आहे. आतापर्यंत असन्नाने अनेक बडय़ा नेत्यांना लक्ष्य केले असून १ ऑक्टोंबर २००३ रोजी तिरूपती येथे चंद्राबाबू नायडू यांच्यावर हल्ला केला होता १९९३ मध्ये हैदराबाद येथे आयपीएस अधिकारी व्यास यांची हत्या, १९९९ मध्ये हैदराबाद येथेच अतिरिक्त विशेष पोलीस महानिरीक्षक उमेश चंद्रा यांची हत्या त्यानेच केली. करीमनगर जिल्हय़ाचे पोलीस अधीाक्षक असताना उमेश चंद्रा यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात कामगिरी केली होती. त्यामुळे असन्नाने हत्या केली होती. त्यानंतर जहाल असन्नाने करनूल जिल्हय़ाचे विद्यमान आमदार डी.वेंगलरेड्डी यांची हत्या केली. त्यांच्या हत्येसाठी तो पोलीस गणवेशात पोलिसांच्या वाहनासारखे वाहन तयार करून आला होता. अशा कितीतरी बडय़ा कारवायांमध्ये असन्नाचा हात असून आंध्र पोलिसांसाठी मोस्ट वान्टेंड आहे.
 गेल्या अनेक वर्षांपासून आंध्र पोलिस त्याच्या मागावर असतानादेखील त्याला पकडू शकले नाही. आता तो गडचिरोली जिल्हय़ाच्या कोरची, कुरखेडा, चामोर्शी किंवा दक्षिण भागात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असन्ना हा अत्यंत चाणाक्ष नक्षलवादी असून त्याने आजपर्यंत केलेल्या कारवायात कुठलाही पुरावा सोडलेला नाही. तो प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या सेंट्रल मिलीटरी कमिशनचा सदस्य आहे. नक्षलवादाने ग्रस्त गडचिरोलीच्या जंगलात थंडावलेली नक्षल मोहीम पुन्हा जिवंत करण्यासाठी, हिंसा भडकविण्यासाठी तसेच हत्यासत्र आरंभ करण्यासाठी माओवाद्यांच्या केंद्रीय मिलिटरी कमिशनने त्याची निवड केली आहे. त्याला सध्या गडचिरोलीत विशेष मोहिमेवर पाठविण्यात आले असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली आहे. या माहितीच्या आधारावर गडचिरोली व अतिदुर्गम भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
 गडचिरोलीत हिंसाचार घडविणे, घातपात करणे यासाठी तो फिरत असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या व्यक्तीची माहिती मिळाल्यास गडचिरोली पोलिसांना तात्काळ कळवावे त्याला एक लाखाचे बक्षीस देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी केले आहे. यासोबतच आंध्र पोलिसांनी २५ लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे. कारवायांची भीती लक्षात घेता गडचिरोली पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Story img Loader