आंध्रमधील तेलंगणा भागात चळवळ पुन्हा सक्रिय करण्यासाठी नक्षलवाद्यांनी निवडलेल्या तरूणांना गडचिरोलीतील सिरोंचाच्या जंगलात प्रशिक्षण दिले जात असून यासाठी आंध्रमधील काही बांधकाम कंपन्या आर्थिक मदत व स्फोटके पुरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कंपन्यांचे संचालक काँग्रेसचे नेते असल्याने सुरक्षा दलांसमोर पेच उभा ठाकला आहे.
महाराष्ट्र व आंध्रच्या सीमेवर प्राणहिता नदीवर बांधण्यात येणाऱ्या चेवेल्ला धरणाच्या कालव्यांचे काम सुशी इंफ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून सुरू आहे. काँग्रेसचे आंध्रमधील माजी मंत्री कोमट रेड्डी व्यंकट रेड्डी यांच्या मालकीच्या या कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या व्यंकटरमण रेड्डी या अधिकाऱ्याला गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांना अर्थ व स्फोटकांचा पुरवठा करण्याच्या आरोपावरून तीन दिवसापूर्वी अटक केली. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या या अधिकाऱ्याच्या चौकशीतून मिळालेली माहिती धक्कादायक आहे. गेल्या काही वर्षांपासून आंध्रमधील तेलंगणा भागात नक्षलवादी चळवळीचा प्रभाव पूर्णपणे ओसरला आहे. हा प्रभाव पुन्हा निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने दोन वर्षांपूर्वी उत्तर तेलंगणा विभाग समितीला कामाला लावले. या समितीने चळवळ पुन्हा सक्रिय करण्यासाठी काही स्थानिक तरुणांना निवडले. तेलंगणा भागात पोलीस व सुरक्षा दले कमालीची सक्रिय असल्याने या तरूणांना खास प्रशिक्षण देण्यासाठी सिरोंचाच्या जंगलात आणण्यात आले. या प्रशिक्षणाची जबाबदारी विभागीय सचिव हरीभूषणवर टाकण्यात आली. आंध्रमध्ये जहाल नक्षलवादी अशी ओळख असलेल्या या हरीभूषणला सुशी कंपनीकडून गेल्या वर्षभरापासून नियमितपणे अर्थपुरवठा केला जात असल्याची माहिती आता समोर आली आहे.
गडचिरोली पोलिसांनी अटक केलेला या कंपनीचा व्यवस्थापक व्यंकटरमण रेड्डी काही मध्यस्थांच्या मार्फत नक्षलवाद्यांना पैशासोबतच स्फोटके सुद्धा पुरवत असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. सुशी कंपनीकडे आंध्रमधील अनेक धरणांची व चौपदरी रस्त्यांची कोटय़वधीची कामे आहेत. व्यंकटरमण रेड्डीचे काम आंध्रमध्ये सुरू असताना तो खास नक्षलवाद्यांना भेटण्यासाठी सिरोंचा येथे आला असताना पाळतीवर असलेल्या पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या सत्यनारायण पालारपवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्याला सुद्धा अटक करण्यात आली. व्यंकटरमण सोबत चिन्ना स्वयंम हा नक्षलवाद्यांचा मध्यस्थ म्हणून काम करणारा इसम सुद्धा होता. तोही सध्या पोलीस कोठडीत आहे. गडचिरोली पोलिसांच्या या कारवाईमुळे आंध्रच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सहा महिन्यापूर्वी आंध्रमधील एका बांधकाम कंपनीच्या सात अधिकाऱ्यांना नक्षलवाद्यांना स्फोटके पुरवतांना ओरीसा राज्यातील मलकानगिरी जिल्हय़ात अटक करण्यात आली होती. त्यानंतर हे दुसरे मोठे प्रकरण उजेडात आले आहे. सुशी कंपनी व नक्षलवाद्यांचे संबंध असल्याचा अहवाल गुप्तचर खात्याने या आधीच दिलेला आहे. या पाश्र्वभूमीवर ही कारवाई झाल्याने आंध्रमधील काँग्रेसचे नेते अडचणीत आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा