नक्षलग्रस्त भागातील तामंदला येथे नक्षलवाद्यांच्या फलकांची जाळपोळ, गुर्जा येथे नक्षल स्मारकाची तोडफोड गावकऱ्यांनी केल्यानंतर पुन्हा नक्षलवाद्यांनी एटापल्ली येथील वन उपज नाक्यावर फलक व भित्तीपत्रके लावून २७ सप्टेंबपर्यंत ‘माओवादी संघटना स्थापना दिवस’ साजरा करण्याचे आवाहन केले. एकीकडे गावकरी नक्षल्यांना गावबंदी करण्याची शपथ घेत असतांना नक्षलवादी गावांत फलक लावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

गडचिरोली जिल्हय़ात गावकरी नक्षलवाद्यांच्या विरोधात आता आवाज उठवायला लागले आहे. गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ग्रामीण भागात जनजागरण मेळावे व अन्य माध्यमातून मोठय़ा प्रमाणात विकास कामे करीत आहेत. गरीब आदिवासींना शासनाच्या विविध सुविधा उपलब्ध करून देत आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तर ग्रामीण व अतिदुर्गम भागात पोलिस ठाण्यांची संख्या वाढवून आदिवासींना लोकोपयोगी योजनांचा फायदा मिळावा यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळेच आदिवासी नक्षल्यांच्या विरोधात एकवटले आहेत. त्याचाच परिणाम तामंदला येथे गावकऱ्यांनी नक्षली फलकांची होळी केली.  गुर्जा येथे नक्षल स्मारक जमीनदोस्त केले. नक्षलवाद्यांच्या विरोधात गावात आवाज उठत असतांना नक्षल्यांनी पुन्हा फलक लावणे सुरू केले आहे. एटापल्ली येथील वन उपज नाक्यावरील शासकीय योजनांची माहिती प्रसिध्द केल्या जाणाऱ्या फलकावर अन्यायाविरुध्द कठोर युध्द पुकारा व माओवादी संघटना स्थापना दिन २१ ते २७ सप्टेंबर साजरा करा, असा मजकूर लिहिलेले नक्षली फलक लावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे गुरुवारी सिरोंचा-आलापल्ली मार्गावर तमदाल फाटय़ाजवळ नक्षल्यांनी लावलेले फलक गावकऱ्यांच्या पुढाकाराने जाळण्यात आले. अहेरी तालुक्यात नक्षलवाद्यांनी उभारलेले शहीद स्मारक गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी तोडले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. चोवीस तास वर्दळीचे ठिकाण असलेल्या एटापल्ली-अहेरी व सुरजागड गट्टा अशा त्रिकोणी तपासणी चौकात शासकीय योजनांची माहिती प्रसिध्द करण्यासाठी फलक लावलेला आहे. नेमका याच फलकावर रात्री ९ वाजताच्या दरम्यान नक्षल्यांनी फलक लावल्याने व या आठवडय़ात गट्टा येथील भूसुरूंग स्फोट, पोलिस नक्षल चकमक, सुरजागड पहाडी परिसरात पोलिसांकडून शक्तिशाली स्फोटके निकामी करणे व फलकबाजीने तालुक्यात दहशत पसरली आहे.

नक्षल समर्थकाची आत्महत्या

धानोरा तालुक्यातील गोडलवाही पोलिस मदत केंद्रांतर्गत बोदिन या गावातील रहिवासी सनिराम सनकू मडावी (२१) या नक्षल समर्थकाने गळफास लावून आत्महत्या केली. सनिराम याच्याविरुध्द नक्षल समर्थक म्हणून गुन्हा नोंद आहे. मागील दहा दिवसांपासून तो बेपत्ता होता. गावकरी त्याचा शोध घेत असतानाच लगतच्या जंगलात त्याचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

Story img Loader