आतापर्यंत ५१६ आदिवासींची हत्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : लगतच्या छत्तीसगड राज्यातून दाखल झालेले जवळपास दीडशे नक्षलवादी मागील पंधरवडय़ापासून भामरागड, एटापल्ली भागात फिरत असल्याने येथे प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. नक्षलवाद्यांनी तीन ग्रामस्थांची हत्या केल्यानंतर कसनासूर गावात स्मशान शांतता आहे. अख्खे गाव दोन दिवसांपासून ठाण्यात मुक्कामी आहे. कुणी काहीही बोलायला तयार नाही. नक्षल्यांनी एकटय़ा गडचिरोली जिल्हय़ात ५१६ आदिवासी बांधवांची  हत्या केली आहे.

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात याच गावालगतच्या इंद्रावती नदीच्या पात्रात नक्षलवाद्यांनी मुक्काम केला होता. त्यानंतर पहाटे झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी ठार झाले होते. तेव्हापासून या गावावर दहशत व भीतीचे सावट आहे. ही भीती केवळ नक्षलवाद्यांची नाही तर पोलिसांनाही या भागातील ग्रामस्थ तेवढेच घाबरतात. जहाल नक्षलवादी नंबाला केशव राव ऊर्फ गगन्ना ऊर्फ बसवराजू  याने महासचिव पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून नक्षली आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे, दक्षिण गडचिरोलीवर पकड असलेली जहाल नक्षलवादी नर्मदाक्का हिलाही तीन महिन्यांपूर्वीच अबुझमाड भागात पाठवण्यात आले असून, आक्रमक नक्षलवाद्यांवर नवीन जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे नक्षलवादी आगामी काळात मोठा हिंसाचार घडवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१० लाखांची मदत द्या

कसनासूर गावातील तीन आदिवासींच्या हत्येनंतर नक्षलपीडित पुनर्वसन समितीने आज गुरुवारी आंदोलन करून पीडित कुटुंबाला दहा लाखांच्या आर्थिक मदतीची मागणी केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एखादी व्यक्ती ठार झाली तर तिला दहा लाखांची आर्थिक मदत दिली जाते. येथे तर नक्षलवादीच हत्या करीत आहेत. तेव्हा पीडित आदिवासींना दहा लाखांची मदत द्या, शासकीय नोकरी द्या, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी नक्षलवाद्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.