छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्य़ात गेल्या आठवडय़ात झालेली एका पत्रकाराची हत्या नक्षलवाद्यांनीच केल्याचे आता स्पष्ट झाले असून यामुळे संतप्त झालेल्या बस्तरमधील पत्रकारांनी आंदोलन सुरू करून नक्षलवाद्यांवर बहिष्कार टाकला आहे. दंडकारण्य भागात नक्षलवाद्यांना प्रथमच माध्यमांच्या असंतोषाचा सामना करावा लागत आहे.
छत्तीसगडच्या बस्तर विभागातील सुकमा जिल्ह्य़ातील पत्रकार नेमीचंद जैन यांची गेल्या १३ फेब्रुवारीला नक्षलवाद्यांनी तोंगपाल गावाजवळ हत्या केली. ४५ वर्षांचे जैन गेल्या २० वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय होते. छत्तीसगडमधील काही हिंदी, तसेच नागपुरातील एका इंग्रजी दैनिकासाठी काम करणारे जैन एका कामासाठी या गावात गेले व तेथून परतताना त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यांच्या मृतदेहाजवळ नक्षलवाद्यांनी एक पत्रक सोडले होते. यात ते पोलीस खबरे असल्याने त्यांना ठार करण्यात येत आहे, असा मजकूर होता. या हत्येच्या दुसऱ्या दिवशी नक्षलवाद्यांनी तातडीने एक पत्रक काढून या हत्येशी चळवळीचा संबंध नाही, असे जाहीर केले. हे पत्रक कटेझरी विभाग समितीने जारी केले होते. दोन दिवसांपूर्वी याच जिल्ह्य़ात सक्रिय असलेल्या दरभा कांगीर विभाग समितीने एक पत्रक जारी करून या हत्येची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे जैन यांची हत्या नक्षलवाद्यांनीच केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
नक्षलवाद्यांकडून पत्रकाराला ठार करण्याची ही पहिलीच घटना असून या भागातील माध्यमांच्या वर्तुळात सध्या संतापाचे वातावरण आहे. जैन यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी दंतेवाडा जिल्ह्य़ातील पत्रकारांनी शुक्रवारी एक मोर्चा काढला. येत्या सोमवारी संपूर्ण बस्तर विभागातील जगदलपूर येथे याच पद्धतीने मोर्चा काढून पत्रकार नक्षलवाद्यांचा निषेध करणार आहेत. जैन यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या नक्षलवाद्यांनी तातडीने जनतेचे न्यायालय भरवून त्यात हत्या करणाऱ्या सदस्याला शिक्षा जाहीर करावी, अशी मागणी छत्तीसगडमधील पत्रकार संघटनांनी केली आहे. जोवर नक्षलवादी हे न्यायालय आयोजित करत नाही तोवर नक्षलवाद्यांच्या पत्रकांना प्रसिद्धी द्यायची नाही, अशी भूमिका आता पत्रकारांनी घेतली आहे. या हत्येच्या निमित्ताने ग्रामीण भागात काम करणाऱ्या व पोलीस तसेच नक्षलवादी या दोघांशीही संबंध ठेवून असणाऱ्या पत्रकारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
दुर्गम भागात काम करणाऱ्या पत्रकारांना अनेकदा पोलीस व नक्षलवाद्यांच्या दबावामुळे अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यातूनच जैन यांची हत्या झाली, असे सुकमा येथील पत्रकारांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा