पश्चिम महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नक्षलवाद्यांनी पाठिंबा दिला आहे. केवळ शेतकरीच नाही तर आदिवासींसकट राज्यातील जनतेवर पोलिसांकरवी अत्याचार करणाऱ्या राज्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी आता सर्वानी सशस्त्र संघर्ष करावा, असे आवाहन नक्षलवाद्यांनी एका पत्रकातून केले आहे.
ऊसाला योग्य भाव मिळावा म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्हय़ातील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसापूर्वी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनात दोन शेतकरी ठार झाले. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या घटनाक्रमावर बारीक नजर ठेवून असलेल्या नक्षलवाद्यांनी आता एक पत्रक काढून या आंदोलनाच्या बाबतीत चळवळीची भूमिका स्पष्ट केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलनाच्या मुद्यावर अशा पध्दतीने मतप्रदर्शन करण्याची नक्षलवाद्याचंी ही पहिलीच वेळ आहे. नक्षलवाद्यांच्या राज्य समितीचा सचिव सहय़ांद्रीच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या पत्रकात राज्यकर्ते केवळ आदिवासींचीच नाही तर राज्यातील शेतकऱ्यांची सुध्दा पिळवणूक करीत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.
राज्यातील काँग्रेस आघाडीचे सरकार जनतेचे प्रत्येक आंदोलन पोलिसांच्या माध्यमातून दडपण्याचा प्रकार करत आहे. विदर्भात सुरू असलेला आदिवासींचा लढा याच पध्दतीने दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात तोच प्रकार पोलिसांनी सुरू केला आहे. आजवर सत्तेत असलेले अजित पवार व त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री आर.आर.पाटील हे मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत जनतेवर गोळय़ा घालण्यासाठी पोलिसांना चिथावणी देत आहेत, असा आरोप नक्षलवाद्यांनी केला आहे. आजवर आदिवासींना तुरूंगात टाकणारे राज्यकर्ते आता या उसाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना तुरूंगात टाकत आहेत. हे सरकार जनतेचे नाही तर साखर सम्राटांचे आहे. केवळ पोलिसांच्या दडपशाहीच्या बळावर कोणतेही राज्य चालवले जाऊ शकत नाही. राज्यातील सरकार मात्र कायम याच मार्गाचा अवलंब करत आहे. परिणामी राज्यात जनतेची सत्ता आणायची असेल तर सशस्त्र संघर्षांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता जनतेने या संघर्षांसाठी रस्त्यावर उतरावे, आमचा पक्ष या आंदोलनाला पूर्णपणे मदत करेल, असे नक्षलवाद्यांनी या पत्रकात म्हटले आहे. राज्याचा विचार केला तर नक्षलवादी चळवळ केवळ पूर्व विदर्भात सक्रीय आहे. पश्चिम महाराष्ट्रात या चळवळीला जनाधार नाही. तो मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठीच नक्षलवाद्यांनी ही पत्रकबाजी सुरू केल्याचे पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा