गेल्या काही महिन्यांपासून दारूगोळय़ाची चणचण भेडसावत असल्यामुळे नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर मात करण्यासाठी नक्षलवाद्यांनी आता त्यांच्या प्रभाव क्षेत्रात कार्य करणाऱ्या कंत्राटदारांवर दारूगोळा पुरवठय़ासाठी दबाब टाकणे सुरू केले आहे.
 गेल्या वर्षभरात संपूर्ण देशभरातील नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये घट झाली आहे. सुरक्षा दले व स्थानिक पोलिसांच्या सक्रियतेमुळेच हिंसाचार कमी झाला असे म्हणून राज्यकर्ते सध्या स्वत:ची पाठ थोपटून घेत असले, तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळीच असल्याची माहिती समोर आली आहे. दहा हजारांची सशस्त्र फौज बाळगणारे नक्षलवादी अचानक कसे काय शांत झाले यावर उलटसुलट चर्चा सुरू असतानाच ही नवीन माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रांना तोटा नाही. विविध चकमकीच्या वेळी पोलीस व सुरक्षा दलांकडून लुटलेली शस्त्रे या चळवळीजवळ आहेत. शिवाय पूवरेत्तर राज्यांत सक्रिय असलेल्या क्रांतिकारी संघटनांकडून नक्षलवाद्यांना नियमित शस्त्रपुरवठा होतो. अडीच हजार कोटींपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेली ही चळवळ चीनमधून नेपाळमार्गे शस्त्र खरेदी करीत असते. हा खरेदीचा व्यवहार सांभाळणाऱ्या एका जहाल नक्षलवाद्याला तीन वर्षांपूर्वी बिहार पोलिसांनी अटक केली होती. नक्षलवाद्यांकडे शस्त्रे भरपूर असली तरी त्यासाठी लागणारा दारूगोळा (काडतूस, मार्टरबॉम्ब व इतर साहित्य) त्यांना अलीकडच्या काळात मिळेनासे झाले आहे. नियमितपणे दारूगोळा मिळवण्यासाठी नक्षलवाद्यांना त्यांच्या शहरी भागातील समर्थकांवरच अवलंबून राहावे लागते. हे समर्थकसुद्धा अतिशय जोखीम पत्करून दारूगोळा जमा करतात व तो जंगलात नेऊन देतात.
सध्या सुरक्षा दलांच्या सक्रियतेमुळे या समर्थकांच्या हालचालींवर बरेच नियंत्रण आल्याने नक्षलवाद्यांना ही रसद मिळणे कमी झाले आहे. यामुळे त्यांना नाईलाजाने हिंसक कारवायांमध्ये घट करावी लागली, असे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर सर्वाधिक प्रभाव असलेल्या छत्तीसगड व ओरिसा राज्यातसुद्धा गेल्या वर्षभरात हिंसाचार कमी झाला आहे. या सर्वच ठिकाणची सुरक्षा यंत्रणा अतिशय चांगले काम करीत आहे म्हणून हिंसाचार कमी झाला, असा निष्कर्ष काढणे धाडसाचे ठरेल, असे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षभरात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमकी मोठय़ा प्रमाणात झाल्या पण, नक्षलवाद्यांनी सापळा रचून मोठी हिंसक कारवाई केली, असे प्रकार मात्र क्वचितच घडले.
दारूगोळाच नसल्यामुळेच नक्षलवाद्यांनी काही काळासाठी माघार घेतली असे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता नक्षलवाद्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर दारूगोळय़ासाठी दबाब टाकणे सुरू केले आहे. या कंत्राटदारांकडून नक्षलवादी नियमितपणे खंडणी घेतात. आता नक्षलवाद्यांनी खंडणी कमी द्या पण कसेही करून दारूगोळा आणून द्या, असा तगादा कंत्राटदारांकडे लावला आहे. या चळवळीच्या प्रभावक्षेत्रात अनेक मोठे कंत्राटदार काम करतात. त्यांची आता दारूगोळय़ासाठी धावपळ सुरू झाली आहे. या कंत्राटदारांच्या हालचालीवरसुद्धा गुप्तचर यंत्रणा बारीक लक्ष ठेवून आहे. आजवर या कंत्राटदारांकडून नक्षलवादी भू-सुरुंगासाठी लागणारी स्फोटके घेत होते. आता या नव्या मागणीमुळे कंत्राटदारसुद्धा पेचात पडले आहेत. बाजारात दारूगोळा उपलब्ध असला तरी विनापरवाना तो विकत घेणे अतिशय जोखमीचे असते. त्यामुळे कंत्राटदारांची व बांधकाम कंपन्यांची पंचाईत झाली आहे. नक्षलवाद्यांना दारूगोळय़ाची चणचण भासत आहे, या माहितीला गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी दुजोरा दिला आहे.

Story img Loader