रवींद्र जुनारकर
नक्षलवाद्यांनी दुर्गम व अतिदुर्गम भागातील गावांत मोठय़ा प्रमाणावर बॅनर, पोस्टर, पत्रकबाजी सुरू केली असून दादापूर, गुरूपल्ली, गट्टा, भामरागड येथे हे चित्र दिसते. बॅनर व पोस्टर जाळणाऱ्या गावकऱ्यांनाही धमकावणे सुरू असून १९ मे च्या नक्षल बंदचे पोस्टर जाळणाऱ्या काही गावकऱ्यांना नक्षलवाद्यांनी ठार मारण्याची धमकी दिल्याने भीतीचे वातावरण आहे.
नक्षलवादी सुरुवातीला विरोध करण्यासाठी किंवा निषेध नोंदविण्यासाठीच चार ते पाच बॅनर, पोस्टर लावत होते. मात्रगेल्या काही दिवसांमध्ये नक्षलवाद्यांनी यात बदल केल्याचे दिसते.
दादापूरच्या वाहन जाळपोळीपासून बदल झाल्याचे दिसते. दादापूरला गावाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून तर गल्ली बोळात शेकडो बॅनर लावले होते.
नक्षलवाद्यांनी नुकत्याच पुकारलेल्या बंद दरम्यानही पोस्टरबाजी केली होती. कोरची, कुरखेडा सोबतच एटापल्ली, भामरागड या भागातही पोस्टरबाजी दिसते. हेच पोस्टर मग पोलिस ग्रामस्थांच्या मदतीने जाळून टाकतात. पोस्टर जाळणाऱ्या गावकऱ्यांना नक्षलवाद्यांनी चांगलेच धमकावले आहे.
आमचे पोस्टर जाळले तर याद राखा, अशी धमकीच नक्षलवाद्यांनी गुरूपल्ली गावातील ग्रामस्थांना दिली आहे. नक्षलवाद्यांच्या बॅनरला ग्रामस्थ कधीच हात लावत नाही. मात्र मागील काही दिवसांत ग्रामस्थांनी पोस्टर जाळल्याच्या घटना समोर येत आहे.