५४ गावांमध्ये दहशत, जखमींनी उपचार घेणेही टाळले
सूरजागड पहाड व परिसरातील ५४ गावात नक्षलवाद्यांची इतकी दहशत आहे की, ७८ वाहनांची जाळपोळ करतांना शंभर-दिडशे स्त्री-पुरुष मजूरांना नक्षलवाद्यांनी हात, पाय आणि पाठीवर बेदम मारहाण करूनही एकही जण ग्रामीण रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात गेला नाही. आता पोलिसांनी चौकशी आरंभिली असून आदिवासींची धरपकड सुरू केली आहे.
गेल्या शुक्रवारी नक्षलवाद्यांनी सूरजागड पहाडावर लोहखनिजाची वाहतूक करणारे ७८ विविद वाहनांची जाळपोळ केली. ते करतांना त्यांनी या पहाडावर लोह उत्खननाचे काम करणाऱ्या सुमारे शंभर-दिडशे स्त्री-पुरुषांना बेदम मारहाण केल्याने त्यांच्या हातपाय आणि पाठीवर काठीचे अक्षरश: व्रण उमटलेले होते, तर अनेकांचे रक्त गोठले. अशाही परिस्थितीत केवळ नक्षल्यांच्या भीतीपोटी मजूर ग्रामीण रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले नाहीत. केवळ नक्षलवाद्यांचीच भीती नव्हे, तर पोलिसांचा चौकशीचा ससेमिरा मागे लागेल, या कारणामुळेही त्यांनी उपचार घेणेच टाळले. विशेष म्हणजे, या जखमांचे घाव अजूनही ओले आहेत. त्यावर मलमपट्टी करणे आवश्यक आहे, परंतु केवळ नक्षलवाद्याच्या भातीपोटी ते सारे हे दु:ख सहन करीत आहेत. मारहाणीनंतर एक मजूर पहाडावरून खाली येतांना त्याचा हात तुटलेला होता. त्याला एका व्यक्तीने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला, तसेच रुग्णालयात नेण्याची तयारीही दाखविली होती, परंतु पोलिसांचा चौकशीचा ससेमिरा मागे लागेल किंवा नक्षलवादी जीवानिशी ठार करतील, या भीतीने त्यांने उपचारच घेतले नाही. आता तो वैद्यांकडून उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेनंतर स्थानिक आदिवासी व मजूरांनाच चौकशीसाठी ताब्यात घेणे सुरू केले आहे. ही घटना नेमकी कशी झाली, याची सविस्तर माहिती पोलिस मजूरांना गाठून किंवा धरपकड करून घेत आहेत. या घटनेनंतर राज्याचे पोलिस महानिरीक्षक सतीश माथूर यांनी रविवारी सूरजागडला भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व जिल्हाधिकारी नायक होते.
जाळपोळीमागे नोटबंदी हेही एक कारण
नोटबंदी हेही जाळपोळीचे एक कारण असल्याची चर्चा एटापल्ली व सूरजागड परिसरात आहे. नक्षलवादी नेत्यांनी सूरजागड येथे लॉयड मेटल्सच्या लोहाखनिज वाहून नेणाऱ्या काही ट्रकचालकांना जुन्या नोटा बदलवून आणण्यासाठी दिल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. ज्या ट्रकचालकांना नोटा बदलण्यासाठी दिल्या होत्या ते नव्या नोटा घेऊन पहाडावर परतलेच नाही. त्यांचीही चौकशी मारहाण करतांना नक्षलवादी करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नोटबंदी हेही या जाळपोळीसाठी एक प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.