गडचिरोली जिल्ह्य़ातील नक्षल चकमक

बोरिया : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बोरिया गावालगत इंद्रावती नदीच्या विस्तीर्ण पात्रातील एका खडकाळ बेटावर सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास नक्षलवादी बेसावध असतानाच सी-६० च्या पथकाने गोळीबार करून ३१ नक्षलवाद्यांना ठार केल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांत झालेल्या दोन चकमकीत एकूण ३७ नक्षलवादी ठार झाले.

छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सीमेवर एटापल्ली व भामरागड या दोन तालुक्यांच्या अगदी मधून बोरिया व कसनासूर या गावाला लागून इंद्रावती नदी वाहते. इंद्रावतीलगतच्या नदीपात्रात नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. शनिवारी कसनासूर गावात एक लग्न होते. या लग्नाला नक्षलवाद्यांनी हजेरी लावली आणि तेथून सुमारे ४० नक्षलवादी इंद्रावती नदीपात्रातील निर्मनुष्य बेटावर आले. ही सर्व माहिती पोलिसांना अगोदरच मिळाली असल्याने अहेरी पोलीस दलाचे सी-६० चे दोन पथक कमांडर मोतीराम मडावी व कमांडर नैताम यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रात्रीच पायवाटेने जंगलात शिरले. तिथेच सी-६० पथकाने नक्षलवाद्यांना अशा पद्धतीने घेरले की एकीकडे इंद्रावती नदीचे पात्र आणि दुसरीकडे दूपर्यंत वाळूच वाळू. त्यामुळे नक्षलवाद्यांना पळण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती.

सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नक्षली व पोलीस चकमक उडाली. पोलिसांनी १३ अ‍ॅम्बुश व दोन हजार राऊंड फायर करून ३१ नक्षलवाद्यांना एकाच ठिकाणी ठार केले. सी-६० पथकाने अचानक ही कृती केल्याने नक्षलवाद्यांना संधीच मिळाली नाही. त्यातही काही नक्षल्यांनी प्रतिकार करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र नक्षलींचा शस्त्रसाठा संपल्यामुळे शेवटी सर्वाना ठार करण्यात पोलिसांना यश मिळाले. यातील काही नक्षल्यांनी जखमी अवस्थेत इंद्रावतीच्या पात्रात उडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ते शक्य झाले नाही आणि तिथेच त्यांचा बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, दोन तास चाललेल्या या चकमकीत एकही सी-६० जवान जखमी कसा झाला नाही, याविषयी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना विचारले असता, आम्ही नक्षलींना अशा पद्धतीने सापळय़ात अडकवले होते की त्यांना प्रतिकारच करता आला नाही. तसेच नक्षल्यांचा शस्त्रसाठाही संपलेला होता, असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. कारवाईत १३ अ‍ॅम्बुश व दोन हजारांच्या वर राऊंड फायर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या कारवाईत पहिल्या दिवशी १६ नक्षल्यांचे मृतदेह मिळाले, तर १५ नक्षल्यांचे मृतदेह पाण्यात बुडाले होते. मात्र सहा ते सात तासांनंतर ते पाण्यावर तरंगताना दिसले. दरम्यान, रविवारी सायंकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे शोध मोहीम त्या रात्री तूर्त थांबवण्यात आली. दुसऱ्या दिवशी सी-६० पथकाने शोध मोहीम सुरू केली तेव्हा नक्षलवाद्यांचे मृतदेह इंद्रावती नदीच्या पात्रात तरंगत होते.

घटनास्थळ घनदाट जंगलात

बोरिया गाव हे १० किलोमीटर अंतरावर आहे. तेथून वाहणाऱ्या इंद्रावती नदीचे तीन किलोमीटरचे विस्तीर्ण पात्र आहे. नदीला लागून मोठमोठय़ा पर्वतरांगा व एक निर्मनुष्य विस्तीर्ण बेट आहे. घनदाट जंगलाने वेढलेला हा परिसर आहे. बोरिया गावापर्यंत चारचाकी वाहन येतात. तिथून जंगल व नदीपात्रातून पाच किलोमीटर अंतर पायदळ गेल्यानंतर घटनास्थळ आहे. प्रस्तृत प्रतिनिधीने बोरिया गावाला भेट दिली असता तेथे स्मशान शांतता दिसून आली.

मंत्र्यांची पाठ

४८ तासात ३७ नक्षलवाद्यांना ठार करून देशात नावलौकिक मिळवलेल्या गडचिरोली पोलीस दलाच्या सी- ६० पथकाचे सर्वत्र कौतुक होत असताना केंद्र व राज्य सरकारच्या मंत्र्यांनी गडचिरोलीत येऊन पोलिसांची पाठ थोपटली नाही. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर अद्याप येथे फिरकले नाही. अहीर चंद्रपूरलगतच्या जिल्हय़ात वास्तव्याला असतात. त्यांना गडचिरोली काही किमी अंतरावर असताना सुद्धा ते आले नाहीत. पालकमंत्री अंबरीश आत्राम यांनीही कौतुकाने पाठ थोपटली नाही. यावरूनच मंत्री किती कोत्या मनाचे आहेत, हे दिसून येते.

कोटय़वधीची रक्कम गोळा केल्याची माहिती

गडचिरोलीत सध्या मोठय़ा प्रमाणात कोटय़वधीची विकासकामे सुरू आहेत. ही विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांकडून मोठय़ा प्रमाणात खंडणी वसूल करण्याचे काम नक्षलवाद्यांनी सुरू केले. चकमक झाली तेव्हा नक्षल्यांकडे खंडणीची मोठी रक्कम होती, अशीही चर्चा परिसरात होती. त्यामुळे ही रक्कम नेमकी कुठे गेली, नक्षलवाद्यांनी ती लपवून ठेवली असणार असेही बोलले जात आहे.

मगरीने मृतदेहाचे हात व पाय खाल्ले

इंद्रावती नदीपात्रात सापडलेल्या १५ पैकी काही नक्षलवाद्यांचे मृतदेह मगरीने खाल्ले होते. नदीपात्रात मगर आहेत, याची कल्पना कुणालाही नव्हती. मृतदेह काढताना मगरी दिसून आल्या. मृतदेह २४ तास पाण्यात राहिल्याने दुर्गंधी सुटली होती.

Story img Loader