जंगलात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांनी दोन वर्षांपूर्वी स्फोटके व शस्त्रांची वाहतूक करणारे ट्रक लुटण्याची योजना आखली होती आणि त्यासाठी खडकी, अहमदनगर तसेच पुलगावच्या दारूगोळा भांडारांजवळ  ‘रेकी’ केली होती, अशी धक्कादायक माहिती एका समर्पित नक्षलवाद्याच्या कबुलीजबाबातून समोर आली आहे.
 मध्य भारतातील घनदाट जंगलात गेल्या तीन दशकापासून सक्रिय असलेले नक्षलवादी शस्त्रे व स्फोटके गोळा करण्यासाठी आजवर अनेक योजना राबवत आले आहेत. प्रारंभीच्या काळात पोलीस ठाणी लुटून शस्त्रे पळवण्याचा उद्योग या चळवळीने मोठय़ा प्रमाणावर केला. नंतर या ठाण्यांभोवतीची सुरक्षा व्यवस्था अभेद्य झाल्यानंतर हे लुटीचे प्रमाण कमी झाले. चकमकीच्या दरम्यान ठार झालेल्या पोलिसांची शस्त्रे लुटण्याचे प्रकार करणाऱ्या नक्षलवाद्यांनी नंतर स्वत:च शस्त्रनिर्मिती सुरू केली. तरीही या चळवळीला शस्त्र व स्फोटकांची चणचण कायम भासत आली आहे. या पाश्र्वभूमीवर नक्षलवाद्यांनी थेट आयुध निर्माणीत तयार होणारी स्फोटके व शस्त्रे लुटण्यासाठी आखलेली योजना सुरक्षा यंत्रणांना धक्का देऊन गेली आहे. या चळवळीसाठी शहरी तसेच जंगली भागात काम करणाऱ्या एका नक्षलवाद्याने काही महिन्यापूर्वी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. चळवळीत विक्रांत ऊर्फ विक्रम या नावाने वावरणाऱ्या या नक्षलवाद्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात या धक्कादायक योजनेचा खुलासा केला आहे.
या चळवळीच्या राज्य समितीचा सचिव दीपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडेने ही लुटीची योजना आखली होती. त्यासाठी राज्यातील दारूगोळा भांडारांची रेकी करण्याची जबाबदारी विक्रांतवर टाकण्यात आली होती. या भांडारांमधून रोज शस्त्रे व स्फोटक साहित्य घेऊन रोज किती ट्रक निघतात, ते कोणत्या ठिकाणी जातात, अशा ट्रकच्या वाहतुकीचा मार्ग नेमका कोणता अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जबाबदारी या विक्रांतवर टाकण्यात आली होती. ही कामगिरी पार पाडण्यासाठी चळवळीने विक्रांतला २०१० च्या जून महिन्यात एक कार विकत घेऊन दिली होती. एम. एच. ०६-२५४६ या क्रमांकाची ही कार घेऊन विक्रांतने काही महिने अहमदनगरला मुक्काम ठोकला होता. या मुक्कामात त्याने खडकी व अहमदनगरहून स्फोटके व शस्त्रे घेऊन नियमितपणे जाणाऱ्या ट्रक्सची बारकाईने पाहणी केली होती. यानंतर विक्रांतला विदर्भातील पुलगावला पाठवण्यात आले. पुलगावलासुद्धा दारूगोळय़ाचे मोठे भांडार आहे. येथेसुद्धा विक्रांतने या भांडारातून बाहेर पडणाऱ्या वाहनांची रेकी केली होती.
या भांडारांमधून बाहेर पडणारी वाहने छत्तीसगडमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून जातात काय याची पाहणी करण्याचे कामसुद्धा विक्रांतवर सोपवण्यात आले होते. याच महामार्गावर गोंदिया जिल्हय़ातील देवरी परिसरात ट्रक लुटण्याची योजना आखण्यात आली होती. ही योजना पूर्णत्वास जाण्याच्या आधीच शहरी भागात काम करणाऱ्या चळवळीतील काही सदस्यांना अटक झाली. त्यानंतर विक्रांतने त्याला दिलेले वाहन अहमदनगरला एका दलालाच्या माध्यमातून विकले. नंतर त्याला नवीन कार उपलब्ध करून देण्यात आली. या कारचा वापर जंगलातून बाहेर पडणाऱ्या सदस्यांची ने-आण करण्यासाठी तसेच स्फोटकांची वाहतूक करण्यासाठी करण्यात आला. विक्रांतने पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीजबाबात या योजनेचा तपशीलवार घटनाक्रम उघड केला असून सुरक्षेच्या कारणासाठी त्याचे खरे नाव सांगण्यास एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नकार दिला आहे. नक्षलवाद्यांनी दोन वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्हय़ात धानोराजवळ स्फोटकांच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन घेऊन जाणारा एक टँकर पळवला होता. हे रसायन जंगलात उतरवून घेतल्यानंतर त्याची चाचणीसुद्धा नक्षलवाद्यांनी केली होती. या पाश्र्वभूमीवर दारूगोळा लुटण्याची नक्षलवाद्यांची योजना आता समोर आल्याने भविष्यात अशा वाहतुकीवर सुरक्षा दलांना बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे मत या अधिकाऱ्याने आज ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

Story img Loader