संगणक अभियंता नयना पुजारी हिच्यावर बलात्कार व खून प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राऊत पळून गेल्याच्या घटनेला आता दीड वर्ष उलटून गेले तरीही त्याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून हा खटला रखडला गेला आहे. दरम्यान, या खटल्यातील माफीच्या साक्षीदाराने आपल्याला आरोपी करावे म्हणून अर्ज केल्यामुळे सरकारी पक्षापुढील डोकेदुखी वाढली आहे.
खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीतील इंजिनिअर असलेली नयना पुजारी ८ ऑक्टोबर २००९ रोजी काम संपवून बस थांबली असताना तिला मोटारीत लिफ्ट देऊन तिच्यावर चौघांनी बलात्कार केला होता. त्यानंतर डोक्यात दगड घालून खून केला व राजगुरुनगरजवळील जंगलात मृतदेह टाकून दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी योगेश राऊत, महेश ठाकूर, विश्वास कदम आणि राजेश चौधरी यांना अटक करण्यात आली होती. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. खटल्याच्या सुनावणीस सुरुवात झाल्यानंतर आरोपींपैकी राजेश चौधरी याला माफीचा साक्षीदार करण्यात आले व त्याचा कबुली जबाब नोंदवण्यात आला. मात्र, खटला सुरू झाल्यानंतर योगेशला ससून रुग्णालयात नेले असता एप्रिल २०१० मध्ये तो पळून गेला. चौधरी हा या गुन्ह्य़ातील मुख्य आरोपी असल्यामुळे खटला लांबत गेला. न्यायालयाने योगेश राऊतला फरार घोषित करून त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. मात्र, त्याच्या नावावर संपत्ती नसल्याचे आढळून आले. त्यामुळे राऊतला वगळून खटला सुरू करण्यात आला. आता माफीचा साक्षीदार झालेल्या चौधरी याने आपल्याला आरोपी करावे म्हणून अर्ज केला आहे. तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
याबाबत विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर म्हणाले की, योगेश राऊत हा या गुन्ह्य़ातील मुख्य आरोपी आहे. तो फरार झाल्यामुळे खटल्यावर त्याचा परिणाम झाला आहे. योगेश राऊतला शोधण्यासाठी पोलिसांना अवधी न्यायालयाने दिला. त्यानंतर तो न सापडल्यामुळे त्याला फरार घोषित करून संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. या न्यायलयीन प्रक्रिया असल्यामुळे खटल्याला उशीर झाला. माफीचा साक्षीदार असलेल्या चौधरीने आपल्याला आरोपी क्रमांक तीन करावे म्हणून न्यायालयात अर्ज केला आहे. आता राऊत दबाव टाकत असल्यामुळेच त्याने अर्ज केला आहे. मात्र, न्यायालयाने चौधरीचा अर्ज अमान्य करून सरकारी वकील माफीच्या साक्षीदाराला तपासून अहवाल देत नाहीत, तोपर्यंत त्याला आरोपी करता येणार नसल्याचे म्हटले आहे. राऊत हा फरार असल्यामुळे त्याला वगळून खटला सुरू करण्यात आला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी १६ जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे.
राऊतला लवकर पकडण्याच्या सूचना
नयना पुजारी खटल्यातील आरोपी योगेश राऊत हा फरार होऊन दीड वर्ष उलटले तरी पोलिसांना सापडत नाही, याबाबत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, आरोपी फरार झाल्याबाबत पूर्वीच मी नाराजी व्यक्त केली आहे. या आरोपीला तातडीने पकडण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत.
का सापडत नाही योगेश राऊत?
योगेश राऊत हा फरार झाल्यापासून पोलीस यंत्रणा त्याचा कसून तपास करत आहेत. मात्र, राऊत हा मोबाईलचा वापर करत नाही. त्याचबरोबर त्याने कुटुंबाशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे त्याला शोधण्यात अडचणी येत आहेत. मात्र, पोलीस योगेश राऊतच्या नातेवाईक, पत्नी, आई-वडील यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. राऊत हा धोबी समाजाचा असल्यामुळे त्याच्या मोठय़ा गरजा नसल्यामुळे तो फारसा बाहेर पडत नसावा. मात्र, पोलीस याप्रकरणी कसून तपास करत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.