अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक शाखेने इंग्रजी लेखिका असल्याच्या कारणावरून सहगल यांना विरोध केल्याने त्यांचे निमंत्रण रद्द केले असे आयोजक सांगत आहेत.

दरम्यान अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मनसेचे नाव पुढे करून कुणाच्या सांगण्यावरून नयनतारा यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले ? कुणाच्या गैरसोयीचे त्या बोलणार होत्या? आयोजकांवर नागपूरहून दबाव आला का? यात मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात, कट्टरवादी विचारसरणीचा हस्तक्षेप आहे का? असे प्रश्न सरोदे यांनी विचारले आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पत्रक प्रसिद्ध करुन या वादावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय या संस्थेकडे संमेलनाचे यजमानपद आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी नयनतारा सहगल यांना पत्र पाठवून उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण रद्द करीत असल्याचे कळवले आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखिकेला का बोलावले, असा आक्षेप नोंदवत काही स्थानिक संघटनांनी संमेलन उधळण्याचा इशारा दिल्याने आम्ही हे निमंत्रण रद्द करीत असल्याचे कारण त्यांनी या पत्रात दिले आहे. सहगल यांनी याबाबत जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर महामंडळ आणि आयोजक संस्थेवर चौफेर टीका सुरू होताच या नामुष्कीचे खापर या दोन्ही संस्था परस्परांच्या डोक्यावर फोडत आहेत.

Story img Loader