काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची आंतरवाली सराटी येथे सभा पार पडली. या सभेत जरांगे-पाटलांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच, मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी केली होती. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“९६ कुळी आणि कुणबी मराठा वेगळा आहे. कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. मीही आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही,” असं नारायण राणेंनी सांगितलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नारायण राणे म्हणाले, “मराठा आणि कुणबींमध्ये फरक आहे. जरांगे-पाटील मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सांगतात. पण, तसं काही नाही. जरांगे-पाटलांनी जातीचा आणि घटनेचा अभ्यास करावा. मी मराठा आरक्षणाचा अभ्यास केला आहे. मात्र, जरांगे-पाटील कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय राहणार नाही, असं बोलत आहेत.”

हेही वाचा : “ईडी अन् सीबीआयचा ससेमिरा संपवायचा असेल, तर…”, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान

“मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही. मी मराठा असून, आयुष्यभर कधीच कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. ९६ कुळी आणि कुणबी मराठा वेगळा आहे,” असं मत नारायण राणेंनी मांडलं.

हेही वाचा : “ही धमकी आहे का, मला संपवून टाकाल का?”; फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेवर सुषमा अंधारे आक्रमक, म्हणाल्या…

नारायण राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. “शरद पवारांनी इस्रायल आणि हमासच्या युद्धावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेली टीका दुर्दैवी आहे. दहशतवाद हा कुणा एका व्यक्तीच्या विरोधात किंवा देशाविरोधातला नसतो. दहशतवाद हा माणुसकीच्या विरोधातला असतो. ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरूनही मांडली आहे. या धोरणाप्रमाणे त्यांनी दहशतवादी हल्ल्याविरोधी भूमिका त्यांनी घेतली. पंतप्रधान मोदींची भूमिका ही पॅलेस्टाईनच्या विरोधात नाही, तर दहशतवादाच्या विरोधात आहे. दहशतवाद विरोधी भूमिका घेणं हे चुकीचं आहे का?” असा सवाल राणेंनी शरद पवारांना विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nayaran rane say kunbi and 96 kuli maratha different jarange patil ssa