गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना मिळालेल्या जागा आणि निवडून आलेल्या सदस्यांच्या समीकरणावर विधानसभेत जास्त जागा मागितल्या होत्या. या वेळी त्यांनी २७ जागा लढविल्या आणि २ उमेदवार निवडून आले. आम्ही २१ जागा लढविल्या आणि राष्ट्रवादीचे ४ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे १४४ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्यात अशी अपेक्षा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. औरंगाबाद येथे सोमवारी राष्ट्रवादीने निर्धार मेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी तटकरे औरंगाबाद येथे आले होते.
गेल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार पक्षाच्या चिन्हावर लढले असते तर जागा जिंकता आली असती, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरही मांडली जाईल. मात्र, गेल्या वेळच्या निकषानुसार अधिक जागा मिळाव्यात, अशी आमची भूमिका आहे. त्यावर अंतिम निर्णय शरद पवार आणि सोनिया गांधीच घेतील.
आघाडीच्या समन्वय समितीची बैठक लवकर घ्यावी, अशी विनंती तीन दिवसांपूर्वी एका पत्रान्वये मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीपूर्वी ५५ दिवसांच्या काळात सरकारकडून काही निर्णय अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. बुधवारी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार केला जाईल. त्यात मराठवाडय़ाला मोठी भूमिका दिली जाईल. मराठवाडय़ाच्या न्यायहक्काचे पाणी मिळायलाच हवे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून तीच कायम राहील. मुख्यमंत्र्यांनाही या बाबतीत सांगितले जाईल, असे तटकरे म्हणाले. आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, आघाडी धर्माची किंमत मोजल्यासारखे आहे. आघाडीचा धर्म निभावताना ती किंमत मोजावी लागली. सिंधुदुर्गात ताकदीने पक्ष बळकट करू, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या १४४ जागांचा आग्रह कायम प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती
गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना मिळालेल्या जागा आणि निवडून आलेल्या सदस्यांच्या समीकरणावर विधानसभेत जास्त जागा मागितल्या होत्या. या वेळी त्यांनी २७ जागा लढविल्या आणि २ उमेदवार निवडून आले. आम्ही २१ जागा लढविल्या आणि राष्ट्रवादीचे ४ उमेदवार विजयी झाले.
First published on: 14-07-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp aggressive for 114 seats in assembly sunil tatkare