विरोधी पक्षनेतेपदावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढला असून विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरुध्द अविश्वास ठराव दाखल केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सरकारला पाठिंबा दिलेला नसून आम्ही विरोधकांच्या भूमिकेतच असल्याचे तटकरे यांनी विधानपरिषदेतही स्पष्ट केले.
विरोधी पक्षनेत्याची घोषणा आजच करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे २८ सदस्य असून काँग्रेसचे २१ आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक निकालानंतर भाजप सरकारला तटस्थ राहून पाठिंबा दिल्याचे जाहीर केल्याने काँग्रेसलाच विरोधी पक्षनेतेपद मिळावे, असा त्यांचा दावा आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे यांचे नाव या पदासाठी निश्चित केले आहे. विधानसभेत काँग्रेसचे ४१ व राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० सदस्य असून दोघांनीही विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केला आहे. आपल्याला आणखी तीन सदस्यांचा पाठिंबा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विधानसभा अध्यक्षांनी याप्रकरणी अॅडव्होकेट जनरलचा सल्ला मागितला असून त्याला अवधी लागणार आहे. त्यामुळे विधानसभेत काँग्रेसला हे पद मिळावे, यासाठी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेण्यात आलेला नाही.
हा निर्णय संख्याबळाच्या ऐवजी कशाच्या आधारे घेणार, असा सवाल तटकरे यांनी सभागृहातही सभापतींपुढे उपस्थित केला. आता विरोधी पक्षनेत्याचा निर्णय सभापतींनी लगेच द्यावा, यासाठी त्यांच्याविरुध्दच अविश्वास ठराव दाखल करण्याची खेळी राष्ट्रवादी काँग्रेस खेळत आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी आक्रमक
विरोधी पक्षनेतेपदावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढला असून विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरुध्द अविश्वास ठराव दाखल केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले.
First published on: 12-12-2014 at 03:26 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp aggressive for opposition leader