राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने आणखी आक्रमक होण्याचा निर्णय घेतला असून, येत्या १४ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मराठवाड्यात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या महिन्यात उस्मानाबादमध्ये काढलेल्या मोर्चावेळीच याचा इशारा दिला होता. दुष्काळामध्ये शेतकऱयांना मदत करण्याबाबत राज्य सरकार उदासीन असल्यामुळे मराठवाड्यात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, असे पक्षातर्फे गुरुवारी सांगण्यात आले.
मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी राज्यातील नेत्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील शेतकऱयांना कर्जमाफी द्यावी, ही राष्ट्रवादीची मुख्य मागणी आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शुल्कमाफी द्यावी. त्याचबरोबर शेतकऱयांचे वीजबील माफ करण्याची मागणीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे.
जूननंतर पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्यात यंदा अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाले आहे. मराठवाड्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून, शेतकऱयांपुढे चारा आणि पाण्याचा मोठा प्रश्न उभा आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात उस्मानाबादमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावेळी केलेल्या भाषणातच राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास पुढील महिन्यात जेलभरो आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली होती. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत सुरुवातीला मराठवाड्यात आणि त्यानंतर टप्प्याटप्याने उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातही जेलभरो आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले. १५ सप्टेंबरला नाशिक आणि नगर जिल्ह्यातही जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठवाड्यातील दुष्काळामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन दिवसांपासून लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यांच्या दौऱयावर आहेत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. या भागातील लोकांना पाणी देण्याचे नियोजन राज्य सरकारने केले असून, रेल्वेच्या माध्यमातून लवकरच पाणी पुरविण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

Story img Loader