अहिल्यानगर : शहरातील एचडीएफसी बँकेच्या फलकावरील अहमदनगर हे नाव बदलून अहिल्यानगर करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ( अजित पवार गट ) आज, मंगळवारी बँकेसमोर निदर्शने केली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी फलकावरील नाव तातडीने बदलून अहिल्यानगर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

शहरातील ज्या दुकानदारांनी अद्याप अहिल्यानगर हे नाव टाकले नाही त्यांनी तातडीने फलक बदलून घ्यावेत, अन्यथा तोडफोड आंदोलन केले जाईल असा इशारा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी यावेळी बोलताना दिला. शहरातील जुन्या बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एचडीएफसी बँकेची शाखा आहे. या बँकेच्या फलकावर अहमदनगर असा उल्लेख असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बँकेसमोर निदर्शने केली.

केंद्र व राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण करीत अहिल्यानगर असे केले असतानाही बँकेने अद्यापि फलकावरती अहमदनगर असाच उल्लेख कायम ठेवला आहे. हा फलक बदलून अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर नामकरण करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनानंतर बँकेच्या प्रशासनाने नाव बदलण्याच्या हालचाली सुरू केल्याचे बारस्कर यांनी सांगितले.

आंदोलनात माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर, अभिजीत खोसे, सुरेश बनसोडे, मंगेश खताळ, युवराज शिंदे, सागर गुंजाळ, केतन क्षीरसागर, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे, लता पवार, रेणुका पुंड, अंजली आव्हाड, सुरज शिंदे, सागर पन्हाळे, सोनू घेमुंड, दिनेश जोशी, राजेश भालेराव आदी सहभागी झाले होते.

Story img Loader