लोकसभा निवडणूक १९ एप्रिलपासून सुरु होणार आहे. देशात सात टप्प्यांमध्ये तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी ठरलेला लोकसभा महाराष्ट्रातला मतदारसंघ हा बारामती ठरला आहे. कारण लोकसभेची ही निवडणूक नणंद विरुद्ध भावजय अशी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बारामतीतून सुप्रिया सुळेंना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काही वेळाने सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या बारामतीतल्या उमेदवार या सुनेत्रा पवार असतील अशी घोषणा केली.
सुनील तटकरेंनी काय म्हटलं आहे?
“सुप्रिया सुळेंचं नाव आधीच त्यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचं नाव जाहीर झाल्यावर सुनेत्रा पवारांचं नाव जाहीर होणं हा काही योगायोग नाही. सुप्रिया सुळेंना उमेदवारी मिळणार हे स्पष्ट झालं होतं. जुलै २०२३ मध्ये आम्ही एकमताने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यशवंतराव चव्हाण यांचा विचार आमच्यासमोर आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाला. ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांकडेच आहे असं निवडणूक आयोगाने सांगितलं. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. मात्र आम्हाला घड्याळ चिन्ह आणि नाव हे आम्हाला मिळालं. शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार आम्ही सोडलेला नाही. बारामतीतली लढाई वैचारिक आहे.” असं सुनील तटकरेंनी म्हटलं आहे.
विजय शिवतारे बंडाची तलवार म्यान केली आहे
विजय शिवतारे यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन बंडाची तलवार म्यान केली. त्यांनी आपण बारामतीच्या रिंगणातून माघार घेणार असल्याचे जाहीर केलं. त्यामुळे आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढाई होणार आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी फार पूर्वीपासूनच बारामतीमध्ये प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र, या दोघींनाही आज पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे बारामती लोकसभेतील प्रचाराची रणधुमाळी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. ही लढत नणंद विरुद्ध भावजय अशी आहे. मात्र एकप्रकारे ही लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच पाहिली जाते आहे. अजित पवारांना ही जागा राखण्यात यश येणार का? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
हे ही वाचा- सुनेत्रा पवारांनी अजित पवारांना दिली श्रीकृष्णाची उपमा, म्हणाल्या, “श्रीकृष्णाविरोधातही भावकी..”
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै २०२३ या वर्षात उभी फूट पडली. अजित पवार आणि त्यांच्यासह ४३ आमदार हे सत्तेत सहभागी झाले. तसंच त्यांना पक्ष आणि चिन्हही मिळलं आहे. शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह मिळालं आहे. सुप्रिया सुळे या बारामतीत मागच्या तीन टर्म खासदार आहेत. आता त्यांच्यासाठी खुद्द शरद पवारांनी कंबर कसली आहे ते तयारीला लागले आहेत. तर पत्नी सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार आणि त्यांच्यासह तमाम भाजपाचे नेते, शिवसेनेचे नेते हे सुनेत्रा पवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. बारामतीत पंतप्रधान मोदीही सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सभा घेण्याची शक्यता आहे.