गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे भाजपा आणि शिंदे गटाकडून सत्ता राखण्याचे आणि बहुमत मिळवण्याचे दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे मविआकडून मात्र तिन्ही पक्षांनी एकत्र लढण्याबाबत भूमिका मांडल्या जात आहेत. मविआतील काही नेतेमंडळींकडून निवडणुका एकत्र लढवण्याबाबत वेगळ्या भूमिका मांडल्या जात असताना याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
पुढील निवडणुकीत मविआ एकत्र की स्वतंत्र?
आगामी विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र? यासंदर्भात संभ्रम असताना अजित पवारांनी स्पष्टपणे मविआ एकत्र राहणार असल्याची भूमिका मांडली आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, “स्टॅम्प आणा, मी लिहून देतो. महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार”.
“अशा प्रकारच्या चर्चा चालतात. एका पक्षातही वेगवेगळे विचार समोर येतात. शेवटी अंतिम निर्णय त्या पक्षाचे सर्वोच्च नेते घेतील. त्याची अंमलबजावणी त्या पक्षाचे कार्यकर्ते करतात”, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. “आम्हाला आमचं मत मांडण्याचा अधिकार असतो. मविआची एकी राहावी म्हणून वरिष्ठ पातळीवर होणारे निर्णय तिन्ही पक्षांना मान्य असतात. त्यामुळे त्यातून वेगळा अर्थ काढू नका”, असंही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून मविआमधील काही नेत्यांकडून वेगळ्या प्रकारची भूमिका मांडण्यात आली होती. मविआमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस की काँग्रेस मोठा भाऊ आहे, यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार आदी नेत्यांनी भूमिका मांडली होती. तसेच, अद्याप मविआ एकत्र लढणार की स्वतंत्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्यामुळे यासंदर्भात संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.