“अजित पवार हे जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे बोलघेवडे नाहीत. ते आपल्या कृतीतून महाराष्ट्राला नवी दिशा देत आहेत. ते खरे बहुजन नेते आहेत. त्यामुळे चळवळीच्या नावाखाली वळवळ करणाऱ्या जितेंद्र आव्हाडने आपले थोबाड वेळीच आवरावे, अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत. आव्हाड यांच्या हिंमत असेल तर समोर येऊन खुल्या मंचावर चर्चा करावी. घाऱ्या डोळ्यांचा तथाकथित पुरोगामी असलेल्या जितेंद्र आव्हाडला महाराष्ट्र उत्तर देण्यास खंबीर आहे, असे आव्हानच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी दिले. अजित पवार यांनी आज बारामती येथे केलेल्या भाषणात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टिका केली होती. मी सख्ख्या भावाचा मुलगा असूनही मला बाजूला केले गेले, असा आरोप अजित पवार यांनी केला होता.
अजित पवारांना हिंदी, इंग्रजी येत नाही – आव्हाड
अजित पवार यांच्या भाषणानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर टिकास्र सोडले. अजित पवार खासदार असताना दिल्लीत जेव्हा त्यांची भाषण करायची वेळ यायची तेव्हा ते बाथरूममध्ये जाऊन बसायचे, अशी खोचक टीका आव्हाड यांनी केली होती. “अजित पवार भाषणाची वेळ आली की मंचावरून पळून जायचे. संसदेत भाषणाची वेळी आली की नेमके बाथरूममध्ये असायचे. कारण त्यांना हिंदी आणि इंग्रजीदेखील बोलता येत नाही. अजित पवारांच्या या मर्यादा महाराष्ट्राला माहिती नव्हत्या. आता आम्हाला त्या मर्यादा लोकांना सांगाव्या लागतील. जेव्हा जेव्हा त्यांची दिल्लीत भाषण करायची वेळ यायची तेव्हा तेव्हा ते बाथरुममध्ये असायचे. कारण भाषण करायला अभ्यास लागतो, मांडणी लागते. यांचा पीए यांना भाषण लिहून द्यायचा मग ते भाषण बोलून दाखवायचे”, असेही आव्हाड म्हणाले होते.
“भाजपाला जे ६० वर्षांत जमलं नाही, ते…”, रोहित पवार यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर
आव्हाड चळवळीच्या नावावर भामटेगिरी करतात
“जितेंद्र आव्हाड हे चळवळीच्या नावावर भामटेगिरी करणारे व्यक्ती आहेत. त्यांना माझे जाहीर आव्हान आहे, जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आणि आम्ही जाहीर मंचावर एकत्र येऊ. त्यात अजित पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले? हे आम्ही सांगू. आम्ही तुमच्या विधानाला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ. आज तुम्ही अजित पवार यांच्या विरोधात बोलत आहात. पण आजवर अजित पवार यांच्याच उपकाराखाली आणि टाचेखाली तुम्ही जगलात. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांविरोधात आपल्या विषारी मेंदूतून सडके विचार बाहेर काढले आहेत”, अशी टीका अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाडांच्या पत्रकार परिषदेनंतर केली.
हे वाचा >> अजित पवारांचे बारामतीकरांना पुन्हा भावनिक आवाहन; म्हणाले, “सख्ख्या भावाच्या घरी जन्मलो..”
“जितेंद्र आव्हाड यांच्यावर जेव्हा जेव्हा खालच्या पातळीचे आरोप झाले, तेव्हा अजित पवार यांनीच त्यांना वाचविण्याचे काम केले. आव्हाडची जहागिरी आता संपुष्टात आली असून फक्त फुगीरी तेवढी बाकी आहे. मुंब्रा – कळव्यातील जनता याची फुगिरीही लवकरच बाहेर काढेल. आव्हाडांचे पोसलेले गुंड लोक वेगवेगळ्या नंबरवरून आम्हाला धमक्या देतात, पण आता आम्हीही त्या भाषेत उत्तर देण्यासाठी तयार आहोत”, असेही मिटकरी म्हणाले.