नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात अपयश आले असले तरी केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीने विधानसभेचे रणशिंग आतापासूनच फुंकले आहे. जागावाटपात आपल्या पारड्यात अधिकाधिक जागा पाडून घेण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने ८५ ते ९० जागांवर दावा सांगितला आहे. छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच ही संख्या सांगितली होती. त्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनीही या संख्येला दुजोरा दिला असून राजीकय पक्ष म्हणून इतरांप्रमाणेच आम्हीही २८८ जागा लढण्याची तयारी ठेवतो, असे विधान प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत केले.
गोंदिया येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रफुल पटेल म्हणाले की, आमचे तीन पक्षाचे सरकार आहे. त्यामध्ये आम्ही सर्व जागा तर मागू शकत नाही. परंतु आमचे संयुक्त राष्ट्रवादीचे आणि सहयोगी मिळून ५७ आमदार होते. त्या अनुषंगाने छगन भुजबळ यांनी ८५ ते ९० जागांची मागणी पुढे केली. आम्हालाही ही संख्या योग्य वाटते.
‘EVM हॅक होऊ शकतात’, एलॉन मस्क यांची शंका; भाजपा नेत्याचे प्रत्युत्तर, म्हणाले, “आमच्याकडून शिका…”
दुसरीकडे शिवसेना आणि काँग्रेस २८८ जागांवर निवडणुका लढविण्याच्या तयारीत आहेत. यावर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, कोणताही राजकीय पक्ष असो त्यांनी युती होण्यापूर्वी २८८ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी लागते. आम्ही सुद्धा २८८ जांगावर निवडणूक लढण्याची तयारी ठेवली आहे. जेव्हा आपण युती करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा वाटाघाटी करून जागा लढवाव्या लागतात. पण युती होण्यापूर्वी आपण २८८ जागांवर लढण्याची तयारी ठेवली पाहीजे. राज्यातील प्रत्येक पक्षांचे असे धोरण असते.
एलॉन मस्कने आम्हाला सल्ले देऊ नयेत
ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अशी शंका जागतिक ख्यातीचे उद्योजक, टेस्ला आणि स्पेसएक्स या मोठ्या कंपन्यांचे प्रमुख एलॉन मस्क यांनी व्यक्त केली. त्यानंतर भारतातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मस्क यांची टिप्पणी ही अमेरिकेतील ईव्हीएमबाबत होती. मात्र त्यावर भारतात वाद होत आहेत. प्रफुल पटेल यांनीही यावर भाष्य केले. “एलॉन मस्क यांनी फक्त गाड्या बनवण्याचे काम करावे, फालतूचे सल्ले देऊ नयेत”, असा टोला पटेल यांनी लगावला.