Tanaji Sawant vs NCP: राष्ट्रवादी काँग्रेसचे टीकाकार असलेले राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात केलेल्या एका विधानामुळे विधानसभा निवडणुकीआधी महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी आपले आयुष्यभर पटले नाही. आता त्यांच्याबरोबर सत्तेत मांडीला मांडी लावून बसलो आहे. पण बाहेर आलो की उलट्या होतात, असे वादग्रस्त विधान तानाजी सावंत यांनी एका जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले असून तानाजी सावंत यांचे ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर महायुतीमधून बाहेर पडू

तानाजी सावंत यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. “तानाजी सावंत यांचे ऐकून घेण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडू, आपल्याला सत्तेची गरज नाही. तानाजी सावंत यांचा आम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे? एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्री केले त्यामुळे तानाजी सावंत यांना मंत्रीपद मिळाले. त्याच भाजपाच्या नेत्यांनी अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतले. हा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाने घेतला होता. महायुतीमुळेच तानाजी सावंत मंत्री आहेत. हे त्यांनी विसरू नये. या पद्धतीने जर राष्ट्रवादीला कोण बोलणार असेल तर आम्ही सत्तेत राहणार नाही”, असा इशारा प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला.

तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशीही मागणी उमेश पाटील यांनी केली आहे. जोपर्यंत हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावू नये, असेही ते म्हणाले.

हे वाचा >> “उद्धव ठाकरेंची मला खरंच दया येते, त्यांना लाचारासारखं…”; देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

तानाजी सावंत काय म्हणाले होते?

धाराशिव येथे एका कार्यक्रमात बोलत असताना तानाजी सावंत म्हणाले की, मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. आयुष्यात कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझे जमलेले नाही. शिक्षण घेत असल्यापासून मला त्यांचे पटलेले नाही. आज जरी मंत्रिमंडळात आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. हे सहन होत नाही, असे विधान तानाजी सावंत यांनी केले होते.

हे ही वाचा >> कारण राजकारण: तानाजी सावंत यांना परंडा पेलवेल?

तानाजी सावंत यांचा इलाज मुख्यमंत्र्यांनी करावा

तानाजी सावंत यांच्या विधानानंतर विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, तानाजी सावंत राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. त्यांना उलट्या कोणत्या कारणामुळे होत असाव्यात, याबद्दल कल्पना नाही. त्याचा आरोग्याशी काही संबंध असू शकेल. पण महायुतीत असल्यामुळे उलट्या होत असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच त्यांचा इलाज करावा.

शिंदे गटाची अजित पवारांवर नाराजी

२०२२ मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड करून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा शिंदे यांच्याबरोबर असणाऱ्या आमदारांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. अर्थमंत्री आम्हाला निधी देत नाहीत, असा आरोप अनेक आमदारांनी केला होता. मात्र २०२३ मध्ये भाजपाने अजित पवार यांना महायुतीत घेतल्यानंतर त्यांच्याकडेच पुन्हा अर्थखाते देण्यात आले. तानाजी सावंत यांनी यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसवर अनेकदा टीका केलेली आहे. २०१९ साली ते भूम-परंडा विधानसभेतून निवडून आले होते. त्याआधी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल मोटे यांच्या ताब्यात होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar faction express disagreement on shiv sena shinde leader tanaji sawant statement kvg