Anjali Damania vs NCP: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्याचे राजकारण ढवळून निघत आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे सत्ताधारी महायुतीचीच अडचण होताना दिसत आहे. तसेच बीडमधील सर्वपक्षीय आमदारही याविरोधात आवाज उचलत असून बीडमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या वादात उडी घेत बीडचे नेते धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले. त्या धनंजय मुंडे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षानेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी अंजली दमानियांवर आरोप करत त्यांना कुणीतरी रिचार्ज करत असल्याचा आरोप केला.
“अंजली दमानिया स्वतःला सामाजिक कार्यकर्त्या म्हणवून घेतात. पण त्यांची आजवरची कारकीर्द पाहिली तर त्यांना कुणीतरी रिचार्ज केल्याशिवाय त्या बोलत नाहीत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्यांचे रिचार्ज कुणी केले, हे पाहावे लागेल. परंतु बीडच्या प्रकरणात त्या स्वतःचे हात शेकवून घेण्याचे प्रयत्न करत आहेत. राज्याचे पोलीस मस्साजोग प्रकरणात आरोपींना नक्कीच पकडतील. अंजली दमानिया बोलतील तसे होणार नाही”, असे सुरज चव्हाण म्हणाले.
सुरज चव्हाण पुढे म्हणाले, “राज्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री खऱ्या गुन्हेगारांना पकडल्याशिवाय राहणार नाहीत. अंजली दमानिया यांनी कितीही पोस्ट किंवा मोर्चात सहभागी झाले, तरी काही फरक पडत नाही. स्वंयघोषित सामाजिक कार्यकर्त्या ज्या स्वतः काहीच काम करत नाही. पण वर्षभर विदेश दौरे करतात. त्यांनी अजित पवारांवर बोलावे म्हणजे पोरखेळ आहे.”
हे ही वाचा >> Suresh Dhas: “प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, परळी पॅटर्नचा उल्लेख करत सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका
अंजली दमानिया यांची कुंडली माझ्याकडे आहे. त्यांनी कुठे जमिनी घेतल्या, त्यांचा उत्पन्नाचा मार्ग काय आहे? याची मला माहिती आहे. त्यांनी भ्रष्टाचारावर बोलावे, म्हणजे प्रसिद्धीसाठी चालवलेला पोरखेळ आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केला.