विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागले आहेत. सध्या राजकीय नेते मंडळी विविध मतदारसंघाचा दौरा करत पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. तसेच विविध ठिकाणी सभा, मेळावे, वेगवेगळ्या भागांना भेटी देणं असं सर्व सध्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचं काम सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांच्या जागावाटपाबाबतही सध्या खलबतं सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधून काहीजण शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटासाठी हा धक्का असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक पाहता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्व घडामोडींबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य केलं. “ज्यांना तिकीट मिळणार नाही ते तिकडचे इकडे आणि इकडचे तिकडे जात असतात, पक्ष बदलत असतात”, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : RSS on Ajit Pawar : ‘भाजपालाच आता अजित पवार नकोसे’, संघाच्या विवेक साप्ताहिकातील लेखावर शरद पवार गटाची मोठी प्रतिक्रिया…

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

“आता विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे अशा घटना घडत असतात. ज्यांना तिकीट मिळणार नाही ते इकडचे तिकडे आणि तिकडेचे इकडे जात असतात. पक्ष बदलत असतात. असं होत असतं. आता राज्यात ७ राजकीय पक्ष आहेत. शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, भारतीय जनता पार्टी, वंतिच बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष आहेत. त्यामुळे लोकांना निवडणूक लढवण्यासाठी भरपूर स्वातंत्र्य आहे”, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

विशाळगडावरील घटनेवर मुश्रीफांची प्रतिक्रिया

विशाळगड येथील जिल्हा प्रशासनाने रविवारी अतिक्रमणाच्या विरोधात केलेली कारवाई आणि त्याआधी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे सध्या तेथील वातावरण तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुश्रीफ म्हणाले, “पालकमंत्री म्हणून प्रशासनाच्या संपर्कात होतो. शांततेत आंदोलन करणार होते, असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे. पण अशा घटना पुन्हा घडू नये, याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. येथील वातावरण शांततेचं कसं राहील, याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. आता आपण अशा पद्धतीचे मोर्चे काढण्यासाठी परवानगी देता कामा नये”, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.