विधानसभेची निवडणूक काही महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. या निवडणुकीच्या आधी आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील काही आमदार संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) पिंपरी चिंचवड शहराध्यक्षांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली. तसेच महापालिकेतील राष्ट्रवादीचे १६ नगरसेवकही शरद पवारांना भेटले. हे सर्वजण शरद पवारांकडे परतण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. आता याच अनुषंगाने अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी शरद पवार गटावर हल्लाबोल केला. तसेच रोहित पवार यांनी सांगावं कोण तुमच्या संपर्कात आहे, असं आव्हान अनिल पाटील यांनी दिलं आहे.
अनिल पाटील काय म्हणाले?
“पिंपरी चिंचवडमधील काही नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली. मात्र, आमचा पक्ष फुटत नाही तर वाढत चालाला आहे. आता ते नगरसेवक शरद पवारांना कशामुळे भेटले? का भेटले? याबाबत मला माहिती नाही. काही दिवसांपूर्वी माझ्या संदर्भात माजी आमदार सतीश पाटील यांनी एक विधान केलं होतं की, अनिल पाटील हे येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीबरोबर जातील. असं त्यांनी जे विधान केलं. ते विधान वैफल्यातून केलं असावं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी विधानं तुम्हाला पाहायला मिळू शकतात”, असा टोला अनिल पाटील यांनी लगावला.
हेही वाचा : मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी!
“माजी आमदार सतीश पाटील यांच्या पुतण्याचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. सतीश पाटील यांच्याच मतदारसंघात त्यांच्या पुतण्याला कमी मतदान मिळालं. आता पुढील दोन महिन्यांच्या काळात हा ईकडे गेला आणि तो तिकडे गेला असे विधानं ऐकायला मिळतील. मात्र, आपण फक्त मनोरंजनाचा भाग म्हणून पाहिलं पाहिजे. अजित पवार यांनी एक विकासाचा दृष्टीकोन ठेवून महायुतीमध्ये सहभाग घेतलेला आहे. आमच्या प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघाचा झालेला विकास हा महत्वाचा आहे. विकासाच्या राजनीतीसाठी आम्ही अजित पवारांबरोबर आहोत. त्यामुळे आमचा एकही आमदार किंवा पदाधिकारी शरद पवार गटातच नाही तर कोणत्याच पक्षात जाणार नाही”, असं अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.
रोहित पवारांना आव्हान
“रोहित पवार दोन महिन्यांपासून बोलत होते की, आमच्याबरोबर १७ आमदार येणार आहेत. येणाऱ्या काळात ते आमच्याबरोबर येणार आहेत. ते आमच्या संपर्कात आहेत. आता आज विधानपरिषदेच्या दोन जागा आम्ही जाहिर करणार आहोत. त्यामुळे ११ तारखेला दूध का दूध और पानी का पानी हेईल. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायला नको, अशी त्यांची वाक्यरचना असते”, असा टोला अनिल पाटील यांनी रोहित पवारांना लगावला.
© IE Online Media Services (P) Ltd