विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते सध्या आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत विधानसभा मतदारसंघातील कामाचा आढावा घेत आहेत. याबरोबरच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सध्या सुरु आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री अनिल पाटील यांनी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना मोठं विधान केलं आहे. “काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी १० जण इच्छुक आहेत. त्यामुळे काँग्रेसला २८८ जागा लढवल्याशिवाय पर्याय नाही”, असा मोठा दावा मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत चर्चांना उधाण आलं आहे. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल पाटील काय म्हणाले?

महाविकास आघाडीत धूसफुस सुरु आहे असं वाटतं का? या प्रश्वावर बोलताना अनिल पाटील म्हणाले, “काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासाठी कमीत कमी १० जण शर्यतीत आहेत. त्यामुळे काँग्रेसला २८८ जागा लढवल्याशिवाय पर्याय नाही. ते फक्त शिवसेना ठाकरे गटाचा एक मुखवटा पुढे करण्यात येत असल्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ सुरु झाली आहे. काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली वाढलेल्या आहेत”, असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “सामना अजून संपलेला नाही, कोण कोणाची विकेट घेतं हे…”; ठाकरे गटाचा मुख्यमंत्री शिंदेंना इशारा

अनिल पाटील पुढे म्हणाले की, “एक गोष्ट नक्की आहे की आज काँग्रेस पक्ष राज्यात ज्या प्रकारे वाटचाल करत आहे. त्या वाटचालीमध्ये त्यांना असं वाटतं की, शिवसेना ठाकरे गट किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोनही पक्ष आपल्याला धोका देऊ शकतात. त्यामुळे आपला पक्ष एकटा पडण्याची शक्यता आहे. अशी चर्चा काँग्रेसच्याच काही नेत्यांमध्ये होत आहे. त्यामुळे आज काँग्रेसने सर्व जागांची तयारी केली आहे”, असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले?

सगेसोयऱ्यांसह मराठा समजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत १३ जुलैपर्यंत राज्य सरकारला मुदत दिलेली आहे. आता मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपायला काही दिवस बाकी असताना मनोज जरांगे यांनी राज्यात आजपासून शांतता रॅली सुरु केली आहे. हिंगोलीतून ही रॅली सुरु झाली आहे.

यावर बोलताना अनिल पाटील म्हणाले, “मनोज जरांगे यांना कोणीही रोखू शकत नाही. मुळामध्ये मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं ते दिलं गेलेलं आहे. सगेसोयरे याबाबात सरकारही सकारात्मक आहे. मात्र, प्रक्रियेसाठी काही कालावधी लागत असतो. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील प्रयत्नशील असतात”, असं अनिल पाटील यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar group leader anil patil statement on there are 10 aspirants for the post of chief minister in congress gkt
Show comments