NCP on Suresh Dhas: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी योग्य कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी (दि. ४ जानेवारी) परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर जाहीर सभा पार पडली. या सभेत भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख करत धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद देऊ नका, अशी मागणी केली. या मागणीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून पलटवार करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान सुरज चव्हाण यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये थेट गृहखात्यावर बोट ठेवले. “स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आ. सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. परभणीच्या सभेत अजितदादांना क्या हुआ तेरा वादा… म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेश धस यांना माझा प्रश्न आहे की, आरोपी स्वतःहून आत्मसमर्पण करत आहेत. मग गृह खाते झोपा काढत आहे का? निष्पक्ष चौकशी होईल म्हणून तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? स्व. संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक जरी नेता, कार्यकर्ता चौकशीत दोषी आढळला तर अजितदादा त्यांच्यावर कार्यवाही करायला गय करणार नाहीत”, अशी पोस्ट सुरज चव्हाण यांनी केली आहे.
हे वाचा >> “बेभान सुटलेला बैल…”, फडणवीसांचा उल्लेख करत अमोल मिटकरींची सुरेश धसांवर टीका
महायुतीत मिठाचा खडा टाकू नका
सुरज चव्हाण पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, आ. सुरेश धस यांना आवरावे. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम ते करत आहेत. विनाकारण अजित पवारांना या प्रकरणात बदमान करण्याचे काम केले तर जशास तस उत्तर आम्ही देऊ.”
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही सुरेश धस यांना लक्ष्य केले. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “तुम्ही न्यायाच्या बाजूने आवाज उठवत आहात. पण त्यामध्ये तुमचा राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. जर सुरेश धस यांना गृहखात्यापेक्षा सखोल माहिती होती तर ते इतके दिवस गप्प का होते. आजपर्यंत तुमचा संजय सिंघानियाच होता का?”
सुरेश धस यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गजनी चित्रपटाचा हवाला दिला होता. मी गजनी चित्रपटातील संजय सिंघानिया सारखा असून माझीही शॉर्ट टर्म मेमरी असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. याच उल्लेखावरून रुपाली चाकणकर यांनी त्यांना संजय सिंघानियाची उपमा दिली.