Chhagan Bhujbal On Amit Shah: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट नाव घेत टीका देखील केली होती. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या मनात नेमकं काय चाललंय? याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी नाशिक जिल्ह्यातील एका कार्यक्रमात अमित शाह आणि छगन भुजबळ हे व्यासपीठावर शेजारी बसलेले पाहायला मिळाले.
एवढंच नाही तर व्यासपीठावर अमित शाह आणि छगन भुजबळ यांच्यात काहीवेळ चर्चाही झाली. त्यामुळे नेमकं काय चर्चा झाली? काही राजकीय चर्चा झाली का? असे सवाल उपस्थित करण्यात आले. मात्र, यावर आता खुद्द छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. ‘जय जवान, जय किसान एवढीच चर्चा झाली. दुसरी काही चर्चा झाली नाही’, असं म्हणत राजकीय चर्चा झाली नसल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ काय म्हणाले?
अमित शाह यांच्याबरोबर काय चर्चा झाली? काही राजकीय चर्चा झाली का? असे सवाल छगन भुजबळ यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले. यावर बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, “चर्चा एवढीच झाली की सर्व चांगलं आहे. तीन वर्षांपूर्वी येथील काही लोक माझ्याकडे आले. तेव्हा मला विश्वास नव्हता की असं होऊ शकतं. पण ही एक खरोखर किमया येथील शेतकऱ्यांनी करून दाखवली असं अमित शाह यांनी म्हटलं”, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
राजकीय चर्चा झाली का?
अमित शाह यांच्याबरोबर काही राजकीय चर्चा झाली का? असं विचारलं असता छगन भुजबळ यांनी म्हटलं की, “जय जवान, जय किसान यावरच चर्चा झाली. दुसरी काही चर्चा झाली नाही. तसेच ते मला म्हणत होते की तुम्ही भाषण का नाही करत? तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही येण्याच्या आधीच मी भाषण केलं. तसेच राजकारणावर काहीही चर्चा झाली नाही”, असं भुजबळांनी सांगितलं.
दिल्लीला बोलावलं आहे का?
अमित शाह यांनी तुम्हाला दिल्लीला बोलावलं आहे का? तुम्ही भविष्यात दिल्लीला जाणार आहात का? असे सवाल छगन भुजबळ यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले. मात्र, यावर थेट उत्तर देणं छगन भुजबळ यांनी टाळलं. ते म्हणाले, “दिल्ली या देशाची राजधानी आहे. तुम्ही आणि आम्ही आपण कधीही जाऊ शकतो”, असं म्हणत त्यांनी अधिक प्रतिक्रिया देणं टाळलं.