Dharmaraobaba Atram On Anil Deshmukh : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अनेक नेत्यांचे सध्या राज्यभर दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून कामांचा आढावा घेत आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात असून उमेदवारांची चाचपणीही करण्यात येत असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. यातच भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अनिल देशमुखांना खुलं आव्हान दिलं आहे. “अनिल देशमुखांनी माझ्या विरोधात अहेरी मतदारसंघातून निवडणूक लढावी”, असं धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटलं. तसेच जर आपल्याला पक्षाने सांगितलं तर त्यांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघामधूनही आपण निवडणूक लढवू शकतो, असंही धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.

हेही वाचा : Anil Deshmukh : देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढवणार का? अनिल देशमुख म्हणाले, “मी एकटा…”

धर्मरावबाबा आत्राम काय म्हणाले?

अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढतील अशी चर्चा आहे. यावर बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “अनिव देशमुखांनी माझ्या अहेरी मतदारसंघामधून माझ्या विरोधात निवडणूक लढवली पाहिजे. ते विदर्भातील चांगले नेते आहेत. त्यामुळे त्यांना माझ्या विरोधात उभं राहायला काही अडचण नाही. किंवा मला जर आमच्या पक्षाने सांगितलं की, त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या विरोधात निवडणुकीत उभं राहा तरीही मला काही अडचण नाही. माझा मतदारसंघ राखीव असला तरी मी कुठेही उभं राहू शकतो. जर मला महायुतीमधील नेत्यांनी सांगितलं त्यांच्या विरोधात उभं राहा तर मी तयार आहे”, असं आव्हान धर्मरावबाबा आत्राम यांनी अनिल देशमुख यांना दिलं आहे.

…तर अनिल देशमुखांचं डिपॉजिट जप्त होईल

नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. यावर बोलताना धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटलं की, “अनिल देशमुख जर देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात उभे राहिले तर अनिल देशमुखांचं डिपॉजिट जप्त होईल.”

अनिल देशमुख फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढवणार का?

विधानसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणुकीच्या तयारीस सुरुवात केली आहे. या अनुषंगानेच नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. अनिल देशमुख हे काटोल या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले. यंदाही ते तेथूनच लढणार, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, आता त्यांच्या नावाची चर्चा दक्षिण-पश्चिम नागपूरसाठी होऊ लागली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar group leader dharmaraobaba atram on anil deshmukh in assembly elections politics gkt